Instagram Hacking : काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांनी इंस्टाग्राम अकाउंट हॅकींगप्रकरणी केलेल्या आरोपांची इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने (IT) दखल घेतली आहे. याप्रकरणी मंत्रालयाकडून आता इंस्टाग्रामची चौकशी होण्याची शक्यता आहे. मंत्रालयाकडून इंस्टाग्रामला काही प्रश्न विचारण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळतेय.


दरम्यान, मंत्रालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयटी मंत्रालयाने हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. या संपूर्ण प्रकरणाची इंन्स्टाग्रामकडून माहिती मागवली जाणार आहे. मंत्रालय जी माहिती विचारणार आहे, त्यामध्ये प्रियंका गांधींच्या मुलांचे इन्स्टाग्राम कधी हॅक झाले? प्रियंका गांधींच्या मुलांचे हॅकिंग झाल्याची माहिती इंस्टाग्रामला कधी मिळाली? मुलांचे इंस्टाग्राम कोणी हॅक केले? मुलांच्या इन्स्टाग्राम खात्यांवरून काही आक्षेपार्ह किंवा अयोग्य पोस्ट होत्या का? इंस्टाग्राम हँडल परत येण्यासाठी किती वेळ लागला? असे प्रश्न मंत्रालयाकडून इंस्टाग्रामला विचारण्यात येणार आहेत.


विरोधी पक्षनेत्यांच्या फोन टॅपिंगच्या आरोपांबाबत प्रियंका गांधी यांना प्रसारमाध्यमांनी प्रश्न विचारला होता. याला उत्तर देत असताना प्रियंका गांधी म्हमाल्या की, फोन टॅपिंग सोडा, 'माझ्या मुलांचे इंस्टाग्राम अकाउंटही हॅक होत आहेत, सरकारकडे दुसरे काही काम नाही का'? असा सवाल त्यांनी केला होता. यापूर्वी, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनीही योगी सरकारवर फोन टॅपिंगचा आरोप केला होता. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे स्वतः त्यांचे संभाषण ऐकतात, असा आरोप केला होता. त्यानंतर प्रियंका गांधीनी आरोप केल्यानंतर आयटी मंत्रालयाने या प्रकरणीची दखल घेतली आहे. त्यामुळे आता मंत्रालयाला संपूर्ण माहिती केव्हा मिळेल, त्यानंतर गरज भासल्यास या प्रकरणाच्या स्वतंत्र चौकशीचे आदेशही देण्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
 
काल पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रयागराज येथे महिला सशक्तीकरण संमेलनात सहभागी झाले होते. त्यावरूनही प्रियांका गांधी यांनी त्यांच्यावर निशाणा साधला होता. 'लड़की हूं, लड सकती हूं' या माझ्या शक्ती संवादानंतर आता पंतप्रधानांनाही महिला सबलीकरणासाठी पुढाकार घ्यावा लागला असल्याचा असा दावा प्रियांका गांधी यांनी केला होता. महिला सबलीकरणासाठी पाच वर्षापूर्वी त्यांनी काही घोषणा का केल्या नाहीत? निवडणुकीपूर्वीच ते अशा घोषणा करत असल्याचे गांधी म्हणाल्या होत्या.


महत्त्वाच्या बातम्या: