नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीची विचारपूस केल्याची माहिती शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते खासदार विनायक राऊत यांनी दिली. आज संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता झाली. त्यानंतर लोकसभा अध्यक्षांच्या दालनात झालेल्या बैठकीत पंतप्रधानांनी उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे.
पंतप्रदान मोदी आणि उद्धव ठाकरे यांचे नाते सौदार्हाचे
संसदेचे हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सचिच्छा भेट घ्यायला गेलो होतो. यावेळी पंतप्रधानांनी आता उद्धव ठाकरेंची तब्बेत कशी आहे, आज ते विधानसभेत जाणार आहे का अशा प्रकारची आपुलकीने त्यांनी विचारपूस केल्याचे विनायक राऊत यांनी सांगितले. याबाबत आम्ही त्यांना माहिती दिल्याचे राऊत म्हणाले. एकीकडे पंतप्रधान उद्धव ठाकरेंच्या प्रकृतीची चौकशी करतात आणि दुसरीकडे राज्यात भाजपचे नेते त्यांच्या प्रकृतीवरुन वेगवेगळी विधाने करत आहेत. त्यांचे मुखदर्शन झाले नाही, ते कधी होणार अशी राजकीय विधाने करत आहेत याबाबत विनायक राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला. यावेळी त्यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचाराची उंची महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांच्या विचारांमध्ये येणे शक्य नसल्याचा टोला राऊत यांनी लगावला. पंतप्रधान मोदी आणि उद्धव ठाकरे यांचे नाते महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांना कळणार नाही. राज्याच्या आणि देशाच्या विकासासाठी या दोघांमध्ये अत्यंत सौदार्हाचे नाते असल्याचे राऊत यावेळी म्हणाले.
आजपासून राज्याच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झालीय. अधिवेशनाच्या कामकाजाला सुरुवात होण्याआधी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलंच शाब्दिक 'वॉर' रंगल्याचं चित्र पाहायला मिळाले. भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर थेट टीका केली आहे. आता मुख्यमंत्री ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा चार्ज आता दुसऱ्याकडे द्यायला हवा अशी आमची मागणी आहे. शिवसेनेतील कुणाला तरी त्यांनी चार्ज द्यायला हवा, असंही पाटील यांनी म्हटलंय. मुख्यमंत्र्यांनी सभागृहात उपस्थित राहावं. विरोधकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तर त्यांनी द्यायला हवी. असे पाटील म्हणाले होते. तसेच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री करा, असे वक्तव्य देखील चंद्रकांत पाटील यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर संजय राऊत यांनी प्रतिउत्तर दिले आहे. तुमच्या सल्ल्याची गरज नाही, कारण, तुमच्या सल्ल्यावर सरकार चालत नाही. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सक्षम आहेत. सल्ले देण्याऐवजी विरोधी पक्षाचं काम चोख बजावा असा टोला राऊत यांनी लगावला होता. तसेच गेल्या 22 दिवसांपासून आम्हालाही पंतप्रधानांच्या मुखदर्शनाची आस असून, त्यासाठी आम्हीही पराकाष्टा करत असल्याचे संजय राऊत म्हमाले होते.