Omicron in India : भारतात ओमायक्रॉन व्हेरियंटच्या (Omicron Variant) रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे. सध्या देशातील ओमायक्रॉनबाधितांची संख्या 214 इतकी झाली आहे. देशात ओमायक्रॉनचा वाढता धोका लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्या बैठक बोलावली आहे. पंतप्रधान मोदी गुरुवारी यासंदर्भात बैठक घेणार आहेत, ज्यामध्ये देशातील कोविड परिस्थितीचा आढावा घेतला जाईल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राज्यांना पावले उचलण्यास सांगितले आहे. दिल्ली आणि महाराष्ट्रात ओमाक्रॉनचे सर्वाधिक 54-54 रुग्ण सापडले आहेत.


केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, 214 पैकी 90 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तेलंगणामध्ये ओमिक्रॉनची 24 प्रकरणे आहेत. त्याच वेळी, कर्नाटकात 19, राजस्थानमध्ये 18, केरळमध्ये 15, गुजरातमध्ये 14 रुग्ण आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये 3 ओमिक्रॉन रुग्णांची पुष्टी झाली आहे. तर ओडिशा, आंध्र प्रदेश आणि यूपीमध्ये 2-2 प्रकरणे आहेत. चंदीगड, लडाख, तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये प्रत्येकी एक ओमिक्रॉन रुग्ण आहे.


देशात गेल्या 24 तासांत 6 हजार 317 नवीन कोविड रुग्ण आढळले आहेत. तर, 318 लोकांचा मृत्यू झाला आणि 6 हजार 906 लोक बरे होऊन घरी गेले. भारतात सध्या 78 हजार 190 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. ओमायक्रॉनच्या वाढत्या रुग्णांमुळे केंद्र सरकारने चिंता व्यक्त केली आहे. दरम्यान, केंद्रीय आरोग्य सचिवांनी राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून ओमायक्रॉनच्या प्रतिबंधासाठी पावले उचलण्यास सांगितले आहे. पत्रात असे म्हटले आहे की, ''विद्यमान वैज्ञानिक पुराव्याच्या आधारावर, ओमायक्रॉन डेल्टा प्रकारापेक्षा कमीतकमी 3 पट जास्त संसर्गजन्य आहे.''


तसेच पत्रा पुढे म्हटले आहे की, ''डेल्टा अजूनही देशाच्या विविध भागांमध्ये आहे. म्हणून, स्थानिक आणि जिल्हा स्तरावर अधिक दूरदृष्टी, डेटा विश्लेषण, द्रुत निर्णय आणि कठोर आणि जलद नियंत्रण कारवाईची आवश्यकता आहे. राज्य आणि जिल्हा स्तरावर तातडीने निर्णय घ्यावे लागतील.''इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha