Covid 19 Cases In Delhi: सध्या दिल्लीत हळूहळू कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. आज दिल्लीमध्ये तब्बल 23 दिवसानंतर 5 हजारांपेक्षा कमी कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. आज दिल्लीत 4 हजार 291 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 34 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  तर आज 9 हजार 397  रुग्ण कोरोनातून बरे झाले आहे. सध्या दिल्लीमध्ये 33 हजार 175 कोरोनाचे नवे सक्रिय रुग्ण आहेत. रुग्णांची संख्या कमी होत असल्याने दिल्ली सरकारने कोरोनाच्या नियमांमध्ये देखील शिथीलता आणली आहे. दिल्लीच्या आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. 


बुधुवारी दिल्लीमध्ये 7 हजार 498 कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. तर मंगळवारी  6028, सोमवारी 5760, रविवारी 9197, शनिवारी 11486  आणि शुक्रवारी 10756 कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. दिल्लीमध्ये आत्तापर्यंत 1815288  लोकांना कोरोनाची लागण झाली होती. तर आत्तापर्यंत 1756369 लोक कोरोनातून बरे झाले आहेत. तर आत्तापर्यंत दिल्लीत कोरोनामुळे 25744 लोकांचा मृत्यू झाला आहे. 


हळूहळू रुग्णांची संख्या कमी होऊ लागल्याने निर्बंध शिथील करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.   गुरुवारी झालेल्या डीडीएमएच्या बैठकीत निर्बंध कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. पुढील बैठकीत शाळा सुरू करण्याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. 


दिल्लीमध्ये सम-विषम पद्धतीत दुकाने उघडली जात होती, ती पद्धत आता बंद करण्यात येणार आहे.
विकेंड कर्फ्यू हटवण्यात आला आहे.
रात्री 10 ते पहाटे 5 वाजेपर्यंत लागू असलेला नाईट कर्फ्यू सुरू राहील.
सरकारी कार्यालयांमध्ये 50 टक्के कर्मचाऱ्यांसह काम करता येणार.
50 टक्के क्षमतेने चित्रपटगृहे उघडण्यास परवानगी.
विवाह समारंभात, स्थळाच्या क्षमतेच्या 50 टक्के (जास्तीत जास्त 200) परवानगी असेल.