मुंबई : गेल्या दोन वर्षापासून सगळं जग ज्या महाभयंकर संकटाचा सामना करत आहे, त्यातून सुटका होण्याची चिन्हे आता दिसू लागली आहेत. कोरोनाचा (Coronavirus) विळखा हळूहळू सैल होत आहे. यामागे सर्वात महत्त्वाचे कारण आहे ते म्हणजे लसीकरण. कोरोनाला प्रतिबंध करणारी लस निर्माण झाल्यानंतर जगभरात सर्वत्र लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. अनेक देशांमध्ये अत्यंत वेगाने लसीकरण पूर्ण झालं असल्यानं तिथली जनता मास्क (Mask)आणि अन्य कठोर निर्बंधातून मुक्त झाली आहे. राज्यात देखील मास्कपासून सुटका होण्याची शक्यता आहे. आज कॅबिनेट बैठकीत मास्क संदर्भात चर्चा करण्यात आली आहे.
अनेक देशांमध्ये ही स्थिती येण्यास आणखी काही कालावधी लागणार आहे. कारण जोपर्यंत लसीकरण मोठ्या प्रमाणावर होत नाही तोपर्यंत कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी निर्बंध पाळणे आवश्यक आहे. आपल्या देशातही जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम राबवण्यात येत असून अतिशय वेगानं लसीकरण पूर्ण करण्यावर भर देण्यात येत आहे. राज्यात आतापर्यंत 14 कोटी 69 लाख 57 हजार नागरिकांना लस देण्यात आली आहे. यामध्ये 6 कोटी 3 लाख 12 हजार 240 नागरिकांनी दुसरा तर 8 कोटी 59 लाख 17 हजार 37 पहिला डोस देण्यात आला आहे. हा महत्त्वाचा टप्पा पार केल्यानंतर आपलीही मास्कपासून सुटका होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आज झालेल्या मंत्रीमंडळच्या बैठकीत मास्क संदर्भात लवकरच टास्क फोर्सशी चर्चा करण्यात येणार आहे. टास्क फोर्सच्या निर्णयानंतर मास्क बाबतीत धोरण जाहीर होणार आहे. राज्यातील सर्वसामान्य जनता मोठ्या आशेने त्या दिवसाची वाट पाहत आहे.
संपूर्ण लसीकरण झालेल्या लोकांना मास्क न घालण्याची परवानगी देणारा इस्रायल हा जगातील पहिला देश होता. इस्रायल अत्यंत वेगवान लसीकरण मोहीम राबवून जनतेला मास्कमुक्त केले पण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान पसरलेल्या कोरोना विषाणूच्या डेल्टा प्रकारामुळे,रुग्ण संख्या वाढू लागल्यानं तिथं पुन्हा मास्क घालणे बंधनकारक करण्यात आले. आज जगात मास्क घालण्यापासून मुक्तता झालेल्या देशांमध्ये ब्रिटन , अमेरिका, स्वीडन, चीन, न्यूझीलंड, हंगेरी, इटली यांचा समावेश आहे. अलीकडेच सौदी अरेबियानेहीलसीकरण पूर्ण झालेल्या लोकांना मास्क न घालण्याची परवानगी दिली आहे. ज्या देशांमध्ये 50 टक्क्यापेक्षा जास्त लोकसंख्येचे लसीकरण पूर्ण झाले आहे. त्या देशांनी लसीकरण पूर्ण झालेल्या लोकांची मास्कमधून सुटका केली आहे. अमेरिकेनं तर 37 टक्के लोकसंख्येचे लसीकरण पूर्ण केल्यानंतर जनतेला मास्क न घालण्याची परवानगी दिली होती.