नवी दिल्ली : स्टॅण्ड अप कॉमेडियन कुणाल कामराविरोधात अवमानना खटला चालवण्याची मागणी करण्यात आली आहे. वकील रिझवान सिद्दीकी यांनी अॅटर्नी जनरल यांच्याकडे याबाबत परवानगी मागितली आहे. रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना सुप्रीम कोर्टाने अंतरिम जामीन मंजूर केल्यानंतर कुणाल कामराने वादग्रस्त ट्वीट केल्याचा आरोप आहे. न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड यांच्याबाबत आक्षेपार्ह आणि अपमानजनक भाषा वापरल्याचा दावा रिझवान सिद्दीकी यांनी केला आहे.


सुप्रीम कोर्टाने बुधवारी अर्णब गोस्वामी आणि इतर दोन आरोपींची अंतरिम जामीनावर सुटका करण्याचा आदेश दिला होता. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर अर्णब गोस्वामी यांना रात्री जेलमधून सोडण्यात आलं. त्यांच्या सुटकेनंतर सोशल मीडियावर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. याबाबत कुणाल कामरानेही ट्वीट केलं होतं. ज्यात त्याने लिहिलं होतं की, "ज्या वेगाने सुप्रीम कोर्ट देशातील महत्त्वाचे मुद्दे मार्गी लावत आहे ते पाहता लवकरच महात्मा गांधीजींच्या फोटोची जागा हरिश साळवे घेतील."





आणखी एका ट्वीटमध्ये कुणाल कामराने लिहिलं आहे की, "डी वाय चंद्रचूड एक फ्लाईट अटेन्डंट आहेत जे फर्स्ट क्लासमधील प्रवाशांना शॅम्पेन ऑफर करतात, कारण ते फास्ट ट्रॅक्ड आहेत. तर सामान्यांना हे माहितच नाही की त्यांना प्रवेश मिळेल, किंवा बसायला मिळेल. सर्व्ह करण्याचा बाब दूरच राहिली."





कुणाल कामराचे हे ट्वीट न्यायालयाचा अवमान असल्याचं म्हटलं जात आहेत. त्याविरोधात वकील रिझवान सिद्दीकी यांनी देशाचे अॅटर्नी जनरल यांना पत्र लिहून कुणाल कामविरोधात न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी गुन्हेगारी खटला चालवण्याची मागणी केली आहे.





कुणाल कामरा याआधीही वादात!
कुणाल कामरा वादात सापडण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी कुणालकामराने मुंबईहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना 'भित्रा' म्हटलं होतं. तसंच गोस्वामी यांना काही प्रश्न विचारले होते आणि हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. यानंतर इंडिगोने कुणालवर सहा महिन्यांची बंदी घातली होती.


अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अर्णब गोस्वामींना अटक
पेशाने वास्तूविशारद असलेल्या अन्वय नाईक यांनी अलिबागजवळच्या कावीर गावात 5 मे 2018 रोजी आत्महत्या केली होती. अर्णब गोस्वामी यांनी पैसे थकवले असून नैराश्येत आत्महत्या करत असल्याचा आरोप अन्वय नाईक यांनी आत्महत्यापूर्वी लिहिलेल्या पत्रात लिहिलं होतं. या प्रकरणी अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक यांच्या तक्रारीनंतर अलिबागमध्ये 306 कलमाअंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर 4 नोव्हेंबर रोजी अलिबाग पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांना अटक केली. कोर्टाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली होती. हायकोर्टाने जामीन देण्यास नकार दिल्यानंतर गोस्वामी यांनी सुप्रीम कोर्टाचं दार ठोठवलं होतं. कोर्टाने बुधवारी (11 नोव्हेंबर) त्यांना अंतरिम जामीन मंजूर केल्यानंतर त्यांनी तळोजा तुरुंगातून सुटका झाली.


संबंधित बातम्या