(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ADR Report: 30 पैकी 29 मुख्यमंत्री कोट्यधीश, जगन मोहन रेड्डी 510 कोटींचे मालक तर ममता बॅनर्जींची संपत्ती 15 लाख
ADR Report: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची संपत्ती 12 कोटींच्या आसपास असून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची संपत्ती ही तीन कोटी रुपये इतकी आहे.
मुंबई: देशातील 30 पैकी 29 मुख्यमंत्री कोट्यधीश असून आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी (Jagan Mohan Reddy) हे सर्वाधिक श्रीमंत म्हणजे 510 कोटी रुपयांची संपत्ती असणारे मुख्यमंत्री आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची संपत्ती 12 कोटीच्या जवळपास आहे. तर या यादीत 15 लाख इतकी सर्वाधिक कमी संपत्ती पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची आहे. निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रकात या गोष्टी नमूद असून त्यावरुन एडीआरने (Association for Democratic Reforms ADR) एक अहवाल तयार केला आहे.
देशातील 28 राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्यमंत्र्यांच्या संपत्तीची माहिती ADR ने आपल्या अहवालात दिली आहे. यामध्ये 30 मुख्यमंत्र्यांपैकी 29 मुख्यमंत्री हे कोट्यधीश आहेत. या सर्व मुख्यमंत्र्यांची सरासरी संपत्ती ही 33.96 कोटी रुपये इतकी आहे.
ADR Report 29 CM Crorepati : टॉप थ्री श्रीमंत मुख्यमंत्री
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांची संपत्ती 510 कोटी रुपये असून ते सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री आहेत. त्यानंतर अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री प्रेमा खांडू यांचा क्रमांक लागत असून त्यांची संपत्ती ही 163 कोटी रुपये इतकी आहे. त्या खालोखाल तिसऱ्या क्रमांकावर ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक असून त्यांची संपत्ती 63 कोटी रुपये इतकी आहे.
सर्वात कमी संपत्ती असणारे मुख्यमंत्री
या अहवालानुसार, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांची संपत्ती ही सर्वात कमी असून ती केवळ 15 लाख रुपये इतकी आहे. त्यानंतर केरळचे मुख्यमंत्री पिनारयी विजयन यांची संपत्ती ही एक कोटी रुपये आहे, तर हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल यांची संपत्ती ही एक कोटी रुपयांच्या वर आहे.
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांची संपत्ती ही प्रत्येकी तीन कोटी रुपये असल्याचं या अहवालात सांगण्यात आलं आहे.
13 मुख्यमंत्र्यांवर गंभीर गुन्ह्यांची नोंद
ADR च्या अहवालानुसार, 30 मुख्यमंत्र्यांपैकी 13 मुख्यमंत्र्यांवर गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्यांची नोंद आहे. त्यामध्ये खून, खुनाचा प्रयत्न, अपहरण आणि अशा इतर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. हे गुन्हे अजामीनपात्र गुन्हे असून यामध्ये जर दोषी सापडले तर संबंधिताला पाच वर्षांपेक्षा अधिकचा तुरुंगवास भोगावा लागेल.
ही बातमी वाचा: