फरीदाबाद : शहरी नक्षलवादाच्या आरोपावरुन महाराष्ट्र पोलिसांची कारवाई सुरुच आहे. पुण्याच्या विशेष न्यायालयाने मानवाधिकार कार्यकर्त्या सुधा भारद्वाज यांचा जामीन अर्ज फेटाळताच पुणे पोलिसांनी भारद्वाज यांना ताब्यात घेतलं आहे. हरियाणातील फरीदाबादमध्ये जाऊन पुणे पोलिसांनी ही कारवाई केली.

पुणे पोलिसांनी हरियाणा पोलिसांसोबत सर्व औपचारिकता रात्रीच पूर्ण केल्या. महिलेला सूर्यास्तानंतर अटक करता येत नाही. त्यामुळे पोलिसांकडून सकाळ होण्याची वाट पाहण्यात आली. पुणे पोलीस रात्री साडे बारा वाजता सुधा भारद्वाज यांच्या निवासस्थानी पोहोचले होते.


सुधा भारद्वाज, अरुण फरेरा आणि वर्नन गोंसालविस यांनी अटकेपासून संरक्षण मिळण्यासाठी पुणे न्यायालायत अर्ज दाखल केला होता. पण कोर्टाने हा जामीन अर्ज फेटाळला. फरेरा आणि गोंसालविस यांना मुंबईतून एकाच दिवशी अटक करण्यात आली होती.

तीनही मानवाधिकार कार्यकर्ते 29 ऑगस्टला अटक केल्यानंतर नजरकैदेत होते. सुप्रीम कोर्टाने 28 सप्टेंबर रोजी स्पष्ट केलं होतं, की हे सर्व जण आणखी चार आठवडे नजरकैदेत राहतील आणि त्यांना खालच्या न्यायालयात जामीन अर्ज करण्याची मुभा असेल. ही मुदत शुक्रवारी संपताच पोलीस पुन्हा अॅक्शन मोडमध्ये दिसून आले.

नक्षल संबंधांवरुन 28 ऑगस्ट रोजी पुणे पोलिसांनी देशभरातील विविध ठिकाणांहून कवी वरावर राव, गौतम नवलखा आणि या तीन जणांना अटक केली होती. भीमा कोरेगाव दंगल आणि त्यापूर्वी आयोजित एल्गार परिषदेशी यांचा संबंध असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.

अरुण फरेरा आणि वर्नन गोंसालविस यांनाही अटक

भीमा कोरेगाव हिंसाचारप्रकरणी नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरुन काल रात्री ठाण्यातून अरुण फरेरा आणि अंधेरी एमआयडीसीतून वर्नन गोंसालविस यांना पुणे पोलिसांनी अटक केली. त्यांना आज पुणे सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं आहे.