मुंबई : सलग दहाव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात झाली आहे. पेट्रोल 40 पैशांनी, तर डिझेलचे दर 37 पैशांनी घसरले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण झाल्याने देशभरात सलग दहाव्या दिवशी इंधनाच्या दरात घट झालेली पाहायला मिळाली. त्यामुळे मुंबईत पेट्रोलचे दर 85.93 रूपये प्रति लिटर, तर डिझेल 77.96 रूपये प्रति लिटर आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सतत तेलाच्या किंमतीत घसरण होत आहे. पुढचे काही दिवस अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे. सप्टेंबरमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. राज्यात तर पेट्रोलने नव्वदी ओलांडली होती. नांदेड जिल्ह्यातील धर्माबादमध्ये पेट्रोल 93 रुपयांच्या पुढे गेलं होतं.

दरम्यान, केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वीच अडीच रुपये आणि राज्य सरकारने अडीच रुपये म्हणजे एकूण पाच रुपये कमी करुन दिलासा दिला होता. त्यात आता दर घसरत असल्याने येत्या काळात पेट्रोल आणि डिझेलची किंमत कमी होण्याची शक्यता आहे.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीचा फटका फक्त वाहनधारकांनाच बसत नव्हता. यामुळे प्रत्येक गोष्टीचे दर वाढून एकूणच महागाई वाढली होती. दळणवळणाचा खर्च वाढल्यामुळे भाजीपाल्यापासून ते दैनंदिन वस्तूंपर्यंत महागाई वाढण्याची परिस्थिती ओढावली होती.

गेल्या दहा दिवसांमध्ये पेट्रोल 2.38 रुपये तर डिझेल 1.31 रुपयांनी कमी झालं आहे.