मुंबई : बीएसपीच्या प्रमुख आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायवती (Mayavati) यांनी सोमवार 15 जानेवारी रोजी स्पष्ट केलं की त्या कोणथ्याही प्रकारच्या युतीमध्ये सामील होणार नाही. दरम्यान बीएसपीचे खासदार मलूक नागर यांच्या वक्तव्यानंतर पंतप्रधान पदाच्या उमेदवारीसाठी मायावती इंडिया आघाडीमध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. त्यांनी काही दिवसांपूर्वी एका वृत्तवाहिनीली दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटलं होतं की, इंडिया आघआडीने (I.N.D.I.A Alliance) मायावती यांना पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून घोषित करावं.
या सर्व चर्चा सुरु असतानाच इंडिया आघाडीमध्ये सामील होण्याचं निमंत्रण देखील मायावती यांना देण्यात येऊ शकतं, असं म्हटलं जातंय. पण मायावती यांनी या चर्चांना पूर्णविराम देत आगामी लोकसभा निवडणुका त्या स्वबळावर लढणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं. निवडणुकांनंतर सरकार स्थापन करणाऱ्या पक्षाला योग्य सहभागासह पाठिंबा दिला जाईल, असं देखील त्यांनी म्हटलं.
दरम्यान, इंडिया आघाडीने मायावती यांना पंतप्रधान पदाचे उमेदवार केले असते तर आघाडीला फायदा झाला असता का, हे जाणून घेण्याचा प्रयत्न एबीपी न्यूजच्या सी व्होटरने केला आहे. सर्वेक्षणात 36 टक्के लोकांनी मायावतींना पंतप्रधानपदाचे उमेदवार बनवले असते तर इंडिया आघाडीला फायदा झाला असता असं म्हटलं. असे केल्याने युतीचा फायदा होत नसल्याचे 42 टक्के लोकांनी सांगितले. त्याच वेळी, 22 टक्के लोकांनी सांगितले की त्यांना याबद्दल 'माहित नाही'.
I.N.D.I.A. मायावतींना पंतप्रधानपदाचे उमेदवार केले तर आघाडीला फायदा झाला असता का?
स्रोत - सी वोटर
हो, फायदा झाला असता - 36 टक्के
नाही, फायदा नसता झाला - 42 टक्के
माहित नाही - 22 टक्के
इंडिया आघाडीकडून पंतप्रधान पदाचा उमेदवार अद्याप जाहीर नाही
इंडिया आघाडीकडून 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर करण्यात आला नाहीये. त्याचप्रमाणे 9 डिसेंबर रोजी आघाडीच्या चौथ्या बैठकीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह काही नेत्यांनी मल्लिकार्जुन खरगे यांचे नाव पुढे केले होते. परंतु काँग्रेस अध्यक्षांनीच त्यास नकार दिला होता. खासदार नसतील तर पंतप्रधानपदावर बोलण्यात काय अर्थ आहे, आधी निवडणुका जिंकणे गरजेचे आहे, असं मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटलं होतं. त्यामुळे आता इंडिया आघाडीचा नवा चेहरा कोण असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.