नवी दिल्ली : देशाच्या राजकारणामध्ये अभूतपूर्वक ठरलेल्या आप आणि काँग्रेसच्या संघर्षाचा इतिहास नवीन नाही. या दोन पक्षांमुळेच भाजपला देशव्यापी आपले पाय पसरता आले. आता याच देशव्यापी पसरलेल्या भाजपच्या आव्हानासमोर 2024 लोकसभा निवडणुकीसाठी तगडे आव्हान निर्माण करण्यासाठी आप आणि काँग्रेस पक्ष (AAP-Congress Seat Sharing Formula) एकत्र आले आहेत. आपचे प्राबल्य असलेल्या चार राज्यामध्ये आप आणि काँग्रेसची चार राज्यांमधील जागावाटपावर जवळपास अंतिम चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. 


दिल्ली, गुजरात, पंजाब आणि हरियाणा या चार राज्यांमध्ये काँग्रेस आणि आपमध्ये जागा वाटपावरून जवळपास अंतिम रूप देण्यात आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस आणि आपमध्ये सातत्याने बैठकांचं सत्र सुरु असून या बैठका फलद्रुप होत असल्याचे चित्र आहे. या बैठकांनंतर दोन्ही पक्षांमधील ज्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत त्यामध्ये सुद्धा या दोन्ही पक्षांमध्ये विरोधाभास दिसून आलेला नाही. त्यामुळे चर्चा योग्य टप्प्यात असल्याचे मानले जात आहे. जागावाटपाचा फॉर्म्युला सुद्धा ठरल्याची माहिती आहे. 


सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दोन्ही पक्षांनी चार राज्यांमध्ये किती जागा लढवणार? यावर जवळपास ठरवलं आहे. आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल आणि काँग्रेस अध्यक्ष मलिकार्जुन खरगे यांच्यामध्ये झालेल्या बैठकीनंतर अनेक निर्णयांवर एकमत झालं आहे. या फॉर्मुल्यावर अंतिम बोलणी सुरू आहेत. त्यामुळे उर्वरित चर्चा पूर्ण झाल्यानंतर औपचारिक घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. 


जागावाटपाचा फॉर्म्युला कसा असेल? (AAP-Congress Seat Sharing Formula)



  • दोन्ही पक्षांमध्ये जो जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवला जात आहे, तो असा काहीसा असेल, असे सांगितले जात आहे.

  • दिल्लीत आप 4 तर काँग्रेस 3 जागांवर निवडणूक लढवू शकते.

  • पंजाबबाबत दोघेही स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार आहेत. मात्र, निवडणुकीपूर्वी अकाली दल आणि भाजप पुन्हा एकत्र आल्यास त्यानंतर दोन्ही पक्ष पंजाबमध्ये निवडणूक लढवतील, असेही त्यांच्यात ठरले आहे. 

  • गुजरातमध्ये काँग्रेस 'आप'ला फक्त 2 जागा देऊ शकते. 'आप'ने 2 हून अधिक जागा मागितल्या आहेत. 

  • हरयाणातही 'आप'ने 2 ते 3 जागांवर निवडणूक लढवण्याची मागणी केली आहे. मात्र, इथेही काँग्रेस आम आदमी पार्टीला 1 पेक्षा जास्त जागा देण्यास तयार नाही.

  • गोव्यात काँग्रेस सध्या 'आप'ला एकही जागा देण्यास तयार नाही. त्याचे कारण म्हणजे गोव्यात लोकसभेच्या फक्त 2 जागा आहेत आणि काँग्रेसला दोन्हीवर निवडणूक लढवायची आहे.


13 जानेवारीला आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांची भेट घेतली. दोन्ही पक्षांचे प्रमुख नेते अशा प्रकारे एकमेकांना भेटण्याची ही पहिलीच वेळ होती. अशा परिस्थितीत या बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली आणि विशेषत: जागावाटपाच्या फॉर्म्युल्याबाबत दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये आतापर्यंत सुरू असलेल्या बैठका कशा पुढे न्याव्यात यावरही चर्चा झाली.


दुसरीकडे, दोन्ही पक्षातील नेते यावर उघडपणे काहीही बोलण्याचे टाळत आहेत. आप नेते सौरभ भारद्वाज यांना खरगे आणि राहुल गांधी यांच्या अरविंद केजरीवाल यांच्या भेटीनंतर जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे का? असे विचारले असता ते म्हणाले की, केजरीवाल यांची राहुल गांधी आणि खरगे यांच्या भेटीनंतर चर्चा झाली असावी.


आघाडीच्या नेत्यांची ही बैठक असल्याचे त्यांनी सांगितले. अजून फार काही बाहेर आलेले नाही. युतीबाबत अजूनही चर्चा सुरू आहे. दोन्ही पक्ष युतीबाबत अत्यंत सकारात्मक असून लवकरच निष्कर्षापर्यंत पोहोचतील, असे सौरभ यांनी सांगितले. यावरून दोन्ही पक्षांच्या नेत्यांमधील बैठकांचा फेरा यापुढेही सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या