ABP C Voter Survey On PM Modi US Visit: टेस्लाचे (Tesla) संस्थापक आणि सीईओ एलॉन मस्क (Elon Musk) यांनी अमेरिका दौऱ्यावर (21 जून) असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचं कौतुक केलं. यावेळी मस्क यांनी भारताच्या पंतप्रधानांचे कौतुक केलं. तसेच, यावेळी भारतासाठी अनेक गोष्टी करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मी चाहता असल्याचंही मस्क यांनी म्हटलं. 


या संदर्भात एबीपी न्यूज सी-व्होटरनं (ABP News C Voter Survey) एकत्रितपणे पीएम मोदींच्या अमेरिकन दौऱ्याबाबत सर्वेक्षण केलं आहे. एलॉन मस्क यांनी केलेल्या मोदींच्या स्तुतीबद्दल लोकांचं काय मत आहे? हे सर्वेक्षणातून जाणून घेण्याचा एबीपी न्यूज सी-व्होटरनं प्रयत्न केला आहे. सर्वेक्षणाच्या निष्कर्षातून अनेक धक्कादायक निष्कर्ष समोर आले आहेत. सर्वेक्षणात 48 टक्के लोकांनी एलॉन मस्क यांनी पंतप्रधान मोदींची मनापासून प्रशंसा केल्याचं म्हटलं आहे.


39 टक्के लोक म्हणाले, मस्क यांनी मोदींची स्तुती केलेली नाही


सर्वेक्षणात 39 टक्के लोकांनी मस्क यांनी पीएम मोदींची प्रशंसा केलेली नाही. त्यांचं वक्तव्य केवळ औपचारिकता असल्याचं म्हटलं आहे. तर 13 टक्के लोकांनी उत्तर माहिती नाही असं दिलेलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपला अमेरिका दौरा संपवून दोन दिवसांच्या इजिप्त दौऱ्यावर पोहोचले आहेत. पंतप्रधान मोदींचा हा पहिलाच अमेरिका दौरा होता, ज्यात त्यांना स्टेट गेस्ट म्हणून बोलावण्यात आलं होतं.




सर्वेक्षणात 8 हजारांहून अधिक लोकांशी बातचित 


पंतप्रधान मोदींच्या या अमेरिका दौऱ्याची जगभरात चर्चा होत आहे. याबाबत सी-व्होटर गेल्या तीन दिवसांपासून एबीपी न्यूजसाठी झटपट सर्वेक्षण करत होतं. तीन दिवसांच्या सर्वेक्षणात आठ हजारांहून अधिक लोकांशी बोलून त्यांची मतं जाणून घेण्यात आली. सर्वेक्षणातील मार्जिन ऑफ एरर प्लस मायनस 3 ते प्लस मायनस 5 टक्के आहे.


एलॉन मस्क म्हणाले की, मी भविष्यातील भारताच्या वाटचालीबाबत खूप उत्सुक आहे. मला वाटतं की, जगातील इतर कोणत्याही मोठ्या देशापेक्षा भारताकडे अधिक ताकद आहे. टेस्लाचे सीईओ मस्क म्हणाले की, या बैठकीची मुख्य गोष्ट म्हणजे, त्यांना (पीएम मोदी) खरोखरंच भारताची खूप काळजी आहे. ते आम्हाला भारतात गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करत आहेत, ज्यासाठी आम्हीही सकारात्मक आहोत.