On this day in history june 25 : आजच्या दिवशी इतिहासात (Din Vishesh) काय घडलं हे जाणून घेण्याची इच्छा सर्वांनाच असते. अनेक चांगल्या वाईट घटनांनी इतिहासातील तारखा नोंदलेल्या (Today History) असतात. आज म्हणजे 25 जून रोजी इतिहासात अनेक महत्वाच्या घटना घडल्या होत्या. 1975 मध्ये आजच्याच दिवशी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यामार्फत देशात आणीबाणीची घोषणा करण्यात आली होती. क्रिकेटविश्वात आजच्या दिवशी 40 वर्षांपूर्वी भारतानं पहिला विश्वचषक जिंकून क्रिडाविश्वावर छाप सोडली. पॉप जगताचा बादशाह मायकल जॅक्सन (Michael Jackson) याने आजच्याच दिवशी अर्थात 25 जून 2009 रोजी या जगाचा निरोप घेतला होता.  याशिवाय इतिहासात अनेक महत्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. तसंच, आजच्या दिवशी असणारे दिग्गजांचे जन्मदिवस आणि निधन झालेल्या महत्वपूर्ण व्यक्तींबद्दल थोडक्यात जाणून घेणार आहोत.


जागतिक कोड त्वचारोग दिन World Vitiligo Day


कोड आजार व कोड असलेल्या लोकांबाबत समाजात समज-गैरसमजच अधिक आहेत. याबाबत जनजागृतीसाठी 25 जून हा दिवस जागतिक कोड दिन म्हणून साजरा करण्यात येतो. हा संसर्गजन्य रोग नाही.


1975 : पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी जाहीर केली 


इतिहासात 25 जून हा दिवस भारताच्या दृष्टीने महत्त्वाच्या घटनेचा साक्षीदार आहे. 1975 मध्ये आजच्याच दिवशी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यामार्फत देशात आणीबाणीची घोषणा करण्यात आली होती, ज्याने अनेक ऐतिहासिक घटनांना जन्म दिला. इंदिरा गांधी यांनी सरकार आणि सत्तेविरोधात आवाज उठवणाऱ्या हजारो लोकांना जेलमध्ये टाकलं होतं. 26 जून 1975 पासून 21 जून 1977 या 21 महिन्यांच्या कालावधीत भारतात आणीबाणी होती.  आणीबाणीच्या काळात लोकसभा निवडणूकही स्थगित केली होती. इंदिरा सरकारविरुद्ध संघर्षाचं बिगुल वाजवणारे लोकनायक जयप्रकाश नारायण आणि मोरारजी देसाई यांसारखे नेते, तसंच सरकारची टीका करणारे पत्रकार, समाजसेवक, विविध संघटनांचे लोक आणि विद्यार्थी यांची रवानगी तुरुंगात केली होती. वृत्तपत्रांना सरकारविरोधात काहीही प्रकाशित करण्यास मज्जाव घालण्यात आला होता आणि जर कोणी हिंमत केली तर त्यांच्यावर सेन्सॉरशिप लादली गेली. राजकीय महत्त्वाकांक्षा आणि सत्ता जाण्याच्या भीतीने इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी जाहीर केल्याचं म्हटलं जातं. जयप्रकाश नारायण, अटल बिहारी वाजपेयी, राजनारायण यांसारखे अनेक नेते इंदिरा गांधी यांच्या धोरणांचे मुख्य विरोधक होते.


भारताने विश्वचषकावर नाव कोरले - 


कोणताही भारतीय क्रिकेट चाहता आजचा दिवस विसरू शकणार नाही. कारण क्रिकेटविश्वात आजच्या दिवशी 40 वर्षांपूर्वी भारतानं पहिला विश्वचषक जिंकून क्रिडाविश्वावर छाप सोडली. भारतानं आजच्या दिवशी म्हणजे 25 जून 1983 रोजी लॉर्ड्समध्ये खेळण्यात आलेल्या अंतिम सामन्यात वेस्ट इंडीजच्या (West Indies) संघाला धुळ चाखली. भारतीय संघाची 1983 विश्वचषकामधील परिस्थिती अत्यंत नाजूक होती. भारताला अनेकदा दुबळ्या संघांना तोंड देण्यासाठी सुद्धा मेहनत घ्यावी लागली. मात्र, भारताच्या शिलेदारांनी भारताचे माजी कर्णधार कपिल देव (Kapil Dev) यांच्या नेतृत्वात आणि आपल्या मेहनतीच्या बळावर 1983 च्या विश्वचषकावर नाव कोरलं.


मायकल जॅक्सन यांचं निधन -


पॉप जगताचा बादशाह मायकल जॅक्सन (Michael Jackson) याने आजच्याच दिवशी अर्थात 25 जून 2009 रोजी या जगाचा निरोप घेतला होता. गाण्यांनी आणि नृत्यशैलीने अवघ्या जगाला भुरळ घालणारा मायकल जॅक्सन सगळ्यांचाच लाडका होता. मायकल जॅक्सनचा जन्म 29 ऑगस्ट रोजी अमेरिकेतील इंडियाना प्रांतातील गॅरी या शहरात झाला. लहानपणापासूनच संगीताची आवड असलेला मायकल 1964मध्ये आपल्या भावाच्या पॉप ग्रुपमध्ये सामील झाला. 1982मध्ये त्याचा 'थ्रिलर' अल्बम रिलीज झाल्यावर त्याला जगभरात ओळख मिळाली. मायकल जॅक्सननेही संगीतासह नृत्यात अनेक विक्रम स्थापित केले आहेत. रोबोट आणि मूनवॉक सारखे नृत्य प्रकार जगभरात प्रसिद्ध करणारा तोच होता. अवॉर्ड्सशिवाय त्याने आपल्या नावावर अनेक जागतिक विक्रम नोंदवले आहेत. यामध्ये 26 वेळा अमेरिकन संगीत पुरस्कार देण्यात आल्याचा समावेश आहे. संगीत आणि नृत्य क्षेत्रात त्याचा कोणी स्पर्धक नव्हता. मायकलला त्याच्या कामामुळे एकदा किंवा दोनदा नाही तर 13 वेळा ग्रॅमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. मायकल जॅक्सन आपल्या प्लास्टिक सर्जरीमुळे अनेकदा चर्चेत असायचा. त्याच्या चेहऱ्यावर अनेकवेळा शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र, त्याने दोनदाच सर्जरी केल्याचं ते सांगायचा.


1924 : संगीतकार मदन मोहन यांचा जन्म  


मदन मोहन यांचे पूर्ण नाव मदन मोहन कोहली असे आहे. त्यांचा जन्म 25 जून 1924 रोजी बगदाद, इराक येथे झाला. मदन मोहन यांचे वडील रायबहादूर इराकमध्ये कामाला होते. 1932 साली त्यांचे कुटुंब भारतात परत आले आणि मदन मोहन यांची रवानगी पंजाब मधील चाकवाल या त्यांच्या मूळच्या गावी झाली.   त्यांचे वडील व्यवसायाच्या शोधात मुंबईला गेले. लखनऊ, मुंबई आणि देहरादून या शहरात शिक्षण पूर्ण करून मदन मोहन सैन्यात भरती झाले. मात्र, त्यांचे संवेदनशील मन सैन्यात रमले नाही आणि 1946 साली संगीतात काही करावे या उद्देशाने त्यांनी सैन्यातील नोकरी सोडली. सैन्य दलातील नोकरी सोडल्यानंर मदन मोहन यांना ऑल इंडिया रेडियोत नोकरी मिळाली आणि लखनौ आकाशवाणीवर ते रुजू झाले. तेथे त्यांची गाठ उस्ताद बिस्मिल्लाह खान आणि उस्ताद फैय्याज खान यांच्यासारख्या महान संगीतकारांशी पडली. फिल्मी दुनियेत मदन मोहन यांची सुरुवात गायक म्हणून झाली १९४८ साली ‘शाहीन’ चित्रपटात. मास्टर गुलाम हैदर यांचे संगीत होते आणि लता मंगेशकर यांच्या बरोबर त्यांनी दोन युगल गीते गायली. 


1931 : माजी पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंह यांचा जन्म 
माजी पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंह यांचा जन्म  25 जून 1931 रोजी  अलाहाबाद जिल्ह्यातील बेलन नदीच्या काठी वसलेल्या दैया येथे राजपूत जमीनदार घराण्यात झाला. सिंह हे 1969 मध्ये उत्तर प्रदेश विधानसभेवर सोरांव येथून काँग्रेस पक्षाचे सदस्य म्हणून निवडून गेले. 1971 मध्ये ते लोकसभेवर निवडून गेले आणि 1974 मध्ये पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी वाणिज्य उपमंत्री म्हणून त्यांची नियुक्ती केली. 1976 ते 77 मध्ये त्यांनी वाणिज्यमंत्री म्हणून काम पाहिले. 1980  मध्ये इंदिरा गांधी जनता सरकारच्या कार्यकाळानंतर पुन्हा निवडून आल्या त्यावेली त्यांची उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी नियुक्ती केली. सिंग यांनी 2 डिसेंबर 1989 रोजी भारताच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली. सिंह यांनी 2 डिसेंबर 1989 ते 10 नोव्हेंबर 1990 या काळात एक वर्षापेक्षा थोडा कमी काळ पदाची धुरा सांभाळली.


1974 : हिंदी चित्रपट अभिनेत्री करिश्मा कपूर हिचा जन्म 
करिश्मा कपूरचा  जन्म 25 जून 1974 रोजी जाला. 1991 साली करिश्माने चित्रपटसॄष्टीत पदार्पण केले. करिश्माने कारकिर्दीत अनेक यशस्वी व्यावसायिक चित्रपटांतून कामे करत 1990 च्या दशकात आघाडीची अभिनेत्री म्हणून हिंदी चित्रपटसृष्टीत स्थान मिळवले. तिने भूमिका साकारलेल्या चित्रपटांपैकी राजा हिंदुस्तानी, दिल तो पागल है, फिजा , झुबैदा  हे चित्रपट विशेष गाजले.


1986 : अभिनेत्री सई ताम्हनकरचा जन्म 
सई ताम्हणकरचा जन्म 25 जून 1986 रोजी झाला. सई ताम्हणकर या मराठी-हिंदी चित्रपट सृष्ंटीतील एक नावाजलेली आणि यशस्वी अभिनेत्री आहे. बिनधास्त अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकरला मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीत ओळखले जाते. सई मूळची  सांगलीतील आहे.  प्रामुख्याने मराठी चित्रपटसृष्टीमध्ये कार्यरत असलेल्या सईने आजवर अनेक चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत.  


1922 : बंगाली कवी सत्येंद्रनाथ दत्त यांचे निधन 
सत्येंद्रनाथ दत्त यांचा जन्म 12 फेब्रुवारी 1882 रोजी झाला. प्रख्यात बंगाली कवी अक्षयकुमार दत्त यांचे सत्येंद्रनाथ हे नातू होते. सत्येंद्रनाथांनी विद्यार्थिदशेतच काव्यलेखन सुरू केले होते. 1899 ते 1903 या काळात त्यांनी चार वेळा कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. परंतु ते शिक्षण त्यांच्या मनाला पटत नसे. मात्र ज्ञानविज्ञानविषयी त्यांना आस्था होती. सविता (१९००), वेणु ओ वीणा (१९०६), होमशिखा (१९०७), फुलेर फसल (१९११), कुहु ओ केका (१९१२), तुलिर लिखन  (१९१४), अभ्र–आबीर (१९१६), हंसतिका (१९१७), बेलाशेषेर गान  (१९२२), बिदाय आरती (१९२२) इ. त्यांचे एकूण पंधरा काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.  


इतर महत्वाच्या घडामोडी 


1900 : भारताचे शेवटचे व्हॉईसरॉय आणि स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल व्हाइसरॉय लुई माउंट बॅटन यांचा जन्म 
 
1907 : नोबेल पारितोषिक विजेते जर्मन भौतिकशास्त्रज्ञ जे.हान्स डी. जेन्सेन यांचा जन्म 


1934 : महात्मा गांधी यांना पुणे महापालिकेने मानपत्र दिले. त्यावेळी त्यांच्यावर बॉम्ब हल्ल्याचा प्रयत्‍न झाला होता.
 
1975 : मोझांबिकला पोर्तुगालकडून स्वातंत्र्य मिळाले 


1993 : किम कॅंपबेल यांनी कॅनडाच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून शपथ घेतली 


1978 : हिंदी चित्रपट अभिनेता आफताब शिवदासानी याचा जन्म
 
1864 : नोबेल पारितोषिक विजते जर्मन रसायनशास्त्रज्ञ वॉल्थर नेर्न्स्ट यांचा जन्म