karnataka Heavy Rain : अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे दक्षिण भारतात पावसाने थैमान घातलं आहे. चार दिवसांपासून कर्नाटकमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. मुसळधार पावसामुळे कर्नाटकमधील जनजीवन विस्कळीत झालं आहे. हजारो लोक बेघर झाले आहेत. रस्त्यावर आणि शेतात पाणीच पाणी झालं आहे. पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेय. मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे कर्नाटकमध्ये आतापर्यंत 24 जणांचा मृत्यू झालाय. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आढावा बैठक घेत शेतकऱ्यांसाठी मदतीची घोषणा केली आहे.
आठवडाभरापासून कर्नाटकमध्ये पावसाने थैमान घातलं आहे. पावसामुळे जीवीतहानी झाली आहे. मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसानही झालेय. जनजीवन विस्कळीत झालेय. जवळपास पाच लाख हेक्टर जमीनीवरील पिकं पाण्यात गेली आहेत. कर्नाटकमधील 658 घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, 8495 घरांचे अंशत: नुकसान झाले आहे. 191 जनावरांचा मृत्यू झालाय. कर्नाटकमधील परिस्थितीचा मुख्यमंत्री बोम्मई यांनी आढावा घेतलाय. मागील काही दिवसांपासून राज्यात संततधार पाऊस सुरु आहे, आतापर्यंत कर्नाटकमध्ये 24 जणांचा मृत्यू झालाय. एक नोव्हेंबरपासून आतापर्यंत केलेल्या प्राथमिक नुकसान आणि नुकसानीच्या अंदाजानुसार, 658 घरांचे पूर्णपणे नुकसान झाले आहे, तर 8,495 घरांचे अंशत: नुकसान झाले आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे, असं कर्नाटक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी राज्यातील पावसाच्या परिस्थितीवर आढावा बैठक घेतली. त्यानंतर तात्काळ स्वरुपाच्या मदतीची घोषणा केली. 79,000 शेतकऱ्यांना 79 कोटी रुपयांची मदत जारी करण्याचे आदेश दिले आहेत. सर्व आधिकाऱ्यांना नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करण्याचे आदेश बसवराज यांनी दिले आहेत. तसेच नुकसानग्रस्त रस्त्यांचे काम तात्काळ सुरु करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.