Spam Calls : स्पॅम कॉलमुळे सर्वजण त्रस्त आहेत. दिवसातून एकतरी असा कॉल आपल्याला येतोच. स्पॅम कॉल्समुळे मोठ्या प्रमाणात फसवणूकही होते. सर्वाधिक स्मॅप कॉल येणाऱ्या देशात भारत चौथ्या क्रमांकावर पोहचलाय. धक्कादायक म्हणजे एका स्पॅमरने वर्षभारत भारतात तब्बल 20 कोटींपेक्षा जास्त कॉल केले आहेत. या स्पॅमरमुळे तासाला तब्बल 27 हजार जणांना त्रास झालाय. 'Truecaller' नुकताच त्यांचा इनसाईड रिपोर्ट सादर केला आहे. या रिपोर्टमध्ये जगभरातील टॉप 10 देशांची यादी जाहीर केली आहे, जे देश स्पॅम कॉलमुळे सर्वाधिक त्रस्त आहेत. या यादीत भारत चौथ्या क्रमांकावर आहे. TrueCaller च्या रिपोर्ट्सनुसार, भारतातील एका व्यक्तीला प्रत्येक महिनाला सरासरी 16 पेक्षा जास्त स्पॅम कॉल येतात. पहिल्या क्रमांकावर असणाऱ्या ब्राझीलमधील एका व्यक्तीला महिन्याला अंदाजे 33 स्पॅम कॉल येतात. तर पेरु देशातील एका व्यक्तीला प्रत्येक महिन्याला सरासरी 18 स्पॅम कॉल्स येतात.
TrueCaller च्या रिपोर्ट्सनुसार, भारतात वर्षभरात एका स्पॅमरने 20 कोटींपेक्षा जास्त कॉल केले आहे. याचाच अर्थ या एका स्पमरने दररोज सहा लाख 64 हजार लोकांना फोन करुन त्रास दिलाय. जर प्रत्येक तासांचा विचार केल्यास या स्पॅमरने प्रत्येक तासाला 27 हजार जणांना फोन केलाय. TrueCaller प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये असणारे ग्लोबल अॅप आहे. TrueCaller कॉन्टॅक्ट व्हेरिफिकेशन आणि नको असलेल्या क्रमांकाला ब्लॉक करण्याचं काम करतं. TrueCaller कडून वर्षाला स्पॅम कॉल संदर्भात रिपोर्ट जारी केला जातो. TrueCaller ने जानेवारी 2021 ते ऑक्टोबर 2021 पर्यंतची आकडेवारी जारी केली आहे. त्यानुसार, या यादीत भारत चौथ्या क्रमांकावर आहे तर ब्राझिल पहिल्या स्थानावर आहे. स्पॅम कॉल्समध्ये ब्राझील आघाडीवर तर पेरु दुसऱ्या आणि यूक्रेन तिसऱ्या स्थानावर आहे. गेल्या वर्षी टॉप-20 स्पॅम कॉलमध्ये भारत नवव्या स्थानी होता. मात्र, यावर्षी चौथ्या क्रमांकावर पोहचलाय.
TrueCaller च्या रिपोर्ट्सनुसार, भारत, ब्राझील, पेरु, यूक्रेन, मेक्सिको, इंडोनेशिया, चिली, व्हिएतनाम, दक्षिण आफ्रिका आणि रशियात स्पॅम कॉल्समध्ये या वर्षी मोठी वाढ झाली आहे. कोरोना काळात भारतामध्ये स्पॅम कॉलमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. स्पॅम कॉलमुळे भारतातील नागरिक हैराण झाले आहेत. सेल्स आणि टोलिमार्केटिंगच्या स्पॅम कॉलमुळे नागरिक हैराण झाले. सेल्स विभागातून 93.5 टक्क्यांहून अधिक रोजचे कॉल्स येतात. तर आर्थिक सेवा देणाऱ्या कंपन्यांकडून 3.1 टक्के कॉल्स येतात. तसेच उपद्रवी आणि घोटाळ्यासंदर्भातले मिळून 3.4 टक्के कॉल्स येतात.
TrueCaller ने आपल्याच रिपोर्ट्सच्या हवाल्यानं सांगितलेय की, स्पॅम कॉल्समध्ये सर्वाधिक कॉल्स KYC आणि OTP च्या संदर्भात असतात. म्हणजेच युजर्सला वाटतेय की KYC साठी त्यांची माहिती विचारली जात आहे. अथवा स्पॅम कॉल्समधून OTP विचारला जातो. एखाद्या सर्व्हिसची खोटी माहिती सांगत स्पॅम कॉल करणारे OTP घेतात अन् फसवणूक करतात.