वॉशिग्टन : भारतात सुरु असलेल्या दहशतवादी कारवायांसाठी पाकिस्तानमधून मदत मिळते, पाकिस्तानच्या जमिनीचा वापर करण्यात येतोय असं अमेरिकेच्या एका अहवालात सांगण्यात आलं आहे. पाकिस्तानने जैश-ए-मोहम्मदचा संस्थापक आणि संयुक्त राष्ट्राकडून दहशतवादी जाहीर करण्यात आलेल्या मसूद अजहर तसेच 2008 सालच्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार असलेल्या साजिद मीरवर कोणतीही कारवाई केली नाही असंही या अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने जागतिक दहशतवादासंबंधी हा अहवाल जाहीर केला आहे. 


अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अॅन्टनी ब्लिंकन यांनी सांगितलं की, "भारतात आणि भारतीय उपखंडात सुरु असलेल्या दहशतवादी कारवाया या पाकिस्तानच्या भूमीवरुन सुरु आहेत. पाकिस्तानमधून या कारवायांना खतपाणी घालणं सुरु आहे."


अमेरिकेच्या या अहवालात सांगितल्याप्रमाणे, अफगाणी, तालिबान आणि त्या संबंधित असलेल्या हक्कानी नेटवर्क आणि इतर दहशतवादी संघटना या पाकिस्तानच्या भूमीवरुन आपल्या कारवाया चालवतात. तसेच संयुक्त राष्ट्राकडून दहशतवादी जाहीर करण्यात आलेल्या मसूद अजहर आणि 2008 सालच्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार असलेल्या साजिद मीरवर कोणतीही कारवाई केली नाही. हे दहशतवादी पाकिस्तानमध्ये खुलेआम फिरत असल्याचं या अहवालात सांगण्यात आलं आहे. 


अमेरिकेच्या या अहवालात नमूद असलेल्या या गोष्टी भारताकडून सातत्याने आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर मांडण्यात येत आहेत. भारतात सुरु असलेल्या दहशतवादी कारवाया या पाकिस्तान पुरस्कृत असल्याचे अनेक पुरावे भारताने अमेरिकेला आणि संयुक्त राष्ट्र संघटनेला दिले आहेत. आता अमेरिकेच्या या अहवालामुळे भारताच्या दाव्यास अधिक बळ प्राप्त झाले आहे. 


संबंधित बातम्या :