नवी दिल्ली : 90 टक्के आयएएस अधिकारी कामचुकार आहेत. त्यांच्याकडून फक्त फाईल अडवण्याचं काम केलं जातं. त्यामुळे विकास हा सचिवालयातच अडकला आहे, असा आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला.
कंत्राटी कामगारांना कायमस्वरुपी करण्याचा प्रस्ताव दिल्यानंतर नोकरशाहीने त्यावर आक्षेप घेतला. त्यानंतर केजरीवाल यांनी नोकरशाहीचा समाचार घेतला. दिल्लीकडे पूर्ण राज्याचा दर्जा असता तर 24 तासांच्या आत कंत्राटी कामगारांना कायमस्वरुपी करुन घेतलं असतं, असंही केजरीवाल म्हणाले.
ऊर्जा विभागाच्या पेंशनधारकांचा सन्मान करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात केजरीवाल बोलत होते. नवी दिल्ली महापालिकेचा अध्यक्ष म्हणून कंत्राटी कामगारांना कायमस्वरुपी करण्याचा प्रस्तावाचा हवाला देत केजरीवाल म्हणाले की, त्यापैकी (आयएएस अधिकारी) 90 टक्के अधिकारी कामं करत नाहीत आणि विकास कामांच्या फाईल रोखून धरतात.
कंत्राटी कामगारांना कायमस्वरुपी करण्याचा प्रस्ताव दिला तेव्हा त्याला सर्व अधिकाऱ्यांनी विरोध केला. असा तर्क असेल तर सर्व आयएएस अधिकाऱ्यांनाही कंत्राटी करायला हवं कारण तेही कामं करत नाहीत, असं केजरीवाल यांनी सांगितलं.