गांधीनगर : राहुल गांधींच्या ‘विकास पागल हो गया’ या टीकेला नरेंद्र मोदींनी चोख प्रत्युत्तर दिलं. ज्या पक्षाचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष स्वतः जामिनावर सुटलेत, त्यांनी विकासाची भाषा करु, नये अशा शब्दात मोदींनी सोनिया आणि राहुल गांधींवर हल्लाबोल केला. गुजरातमधील गांधीनगरमध्ये भाजपनं आयोजित केलेल्या गुजरात गौरव यात्रेदरम्यान ते बोलत होते.
शिवाय, विरोधक 8 नोव्हेंबरला काळा दिवस पाळतील, तर मी काळ्या पैशांपासून देशाला मिळालेली मुक्ती साजरी करेन, असं देखील मोदी म्हणाले.
'जामिनावर सुटलेल्या माय-लेकांनी विकासावर बोलू नये'
राहुल गांधी आणि सोनिया गांधींचं नाव न घेता मोदी म्हणाले की, “जे तुरुंगाची हावा खाऊन आले, त्यांच्याशीच हे खांद्याला खांदा लावून उभे राहतात. भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली जामिनावर माय-लेकराची सुटका झाली. ज्या पक्षाचे प्रमुखच भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली जामिनावर सुटलेत, असे लोक गुजरातचं काय भलं करणार?”
काँग्रेसला नेहमी घराणेशाही टीकवण्याची चिंता
पंतप्रधान म्हणाले की, काँग्रेसने नेहमी खुर्चीसाठी अनेक खेळी केल्या. त्यांना आपली घराणेशाही टीकवण्याची नेहमी चिंता असते. त्यांना देशाची काळजी आणि समाजाची काळजी नाही. त्यांच्यासाठी घराणेशाही महत्त्वाची आहे. पण आमच्यासाठी विकास महत्त्वाचा आहे. त्यामुळे घराणेशाही आणि विकासाच्या या युद्धात विकासाचाच विजय होईल, याचा मला विश्वास आहे.”
नर्मदा प्रकल्प काँग्रेसच्या डोळ्यात खुपतो
नर्मदा प्रकल्पावरुनही मोदींनी काँग्रेसवर टीकास्त्र झोड उठवली. मोदी म्हणाले की, “पंडित नेहरुंनी ज्या नर्मदा प्रकल्पाचं भूमीपूजन केलं, त्याची संकल्पना सरदार पटेलांनी मांडली होती. त्यामुळे ते पूर्ण होण्यासाठी अनेक अडथळे निर्माण केले गेले. म्हणूनच 40 वर्ष हा प्रकल्प पूर्ण होऊ शकला नाही. पण आता तो प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर, त्यांच्या (काँग्रेसच्या) डोळ्यात हे खुपत आहे.”
...म्हणून अमित शाहांना तुरुंगात पाठवलं
सोहराबुद्दीन प्रकरणात अमित शाहांच्या तुरुंगवासावरुन पंतप्रधान मोदींनी काँग्रेसला घेरलं. मोदी म्हणाले की, “जेव्हा मी गुजरातचा मुख्यमंत्री होतो, तेव्हा माझ्याविरोधात अनेक षडयंत्रे रचली गेली. मला तुरुंगात पाठवण्यासाठी अमित शाहांना तुरुंगात पाठवलं. पण आज पाहा, ते कुठं आहेत, आणि आम्ही कुठे आहोत”
तसेच काँग्रेसने विकासाच्या मुद्यावर निवडणूक लढवून दाखवावी. जनतेची दिशाभूल करु नये, असं खुलं आव्हान त्यांनी यावेळी दिलं.
Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
जामिनावर सुटलेल्या माय-लेकांनी विकासावर बोलू नये : पंतप्रधान मोदी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
16 Oct 2017 09:23 PM (IST)
राहुल गांधींच्या ‘विकास पागल हो गया’ या टीकेला नरेंद्र मोदींनी चोख प्रत्युत्तर दिलं. ज्या पक्षाचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष स्वतः जामिनावर सुटलेत, त्यांनी विकासाची भाषा करु, नये अशा शब्दात मोदींनी सोनिया आणि राहुल गांधींवर हल्लाबोल केला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -