मुंबई: देशभरात 1 ऑक्टोबर 2018 अर्थात आजपासून नवे सात नियम लागू होणार आहेत. या नियमांचा थेट परिणाम तुमच्या आमच्यावर होणार आहे. आजपासून छोट्या बचत ठेवींवर जास्त व्याज मिळेल. तर कॉल ड्रॉप झाल्यास मोबाईल कंपन्यांना दंड द्यावा लागणार आहे. शिवाय गॅस दरात वाढ झाली आहे.
पीपीएफ, सुकन्या, समृद्धी, NSC आणि KVP वर जास्त व्याज
आर्थिक वर्षाची तिसरी तिमाही अर्थात ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान, छोट्या बचत ठेवींवर जास्त व्याज मिळणार आहे. मुदत ठेव, रिकरिंग, ज्येष्ठ नागरिकांची बचत ठेव, मासिक उत्पन्न खातं, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट, पल्बिक प्रोव्हिडेंट फंड, किसान विकास पत्र आणि सुकन्या समृद्धी स्कीमवर पहिल्यापेक्षा 0.40 टक्केपर्यंत जास्त व्याज मिळणार आहे.
गॅस सिलेंडर महागलं -
पेट्रोलियम मंत्रालयाने नैसर्गिक गॅसच्या किमती वाढवल्या आहेत. त्यामुळे एलपीजी आणि सीएनजीचे दरही वाढणार आहेत. अनुदानित एलपीजी सिलेंडर 2 रुपये 89 पैसे तर विनाअनुदानित एलपीजी सिलेंडर तब्बल 59 रुपयांनी महागला आहे.
कॉल ड्रॉप झाल्यास दंड -
कॉल ड्रॉपच्या समस्येला संपूर्ण देश वैतागला आहे. मात्र या समस्येवर आजपासून नवा उपाय लागू होणार आहे. कॉल ड्रॉप झाल्यास मोबाईल कंपन्यांना दंड ठोठावण्यात येणार आहे. कॉल ड्रॉपच्या समस्येवर 2010 नंतर पहिल्यांदाच बदल करण्यात आला आहे.
ई-कॉमर्स-
ई कॉमर्स कंपन्यांना GST अंतर्गत टॅक्स कलेक्टर अॅट सोर्ससाठी सर्व राज्यांमध्ये रजिस्ट्रेशन करावं लागेल. तिथे त्यांचे पुरवठादार असतील. परदेशी कंपन्यांना रजिस्ट्रेशनसाठी एका एजेंटचीही नियुक्ती करावी लागेल. त्यामुळे ई कॉमर्स कंपन्यांना आपल्या पुरवठादारांना पेमेंट करण्यासाठी 1 टक्के TCS द्यावा लागेल.
TDS-
जीएसटी कायद्याअंतर्गत TDS आणि TCS च्या नव्या तरतुदी आजपासून लागू होतील. केंद्राच्या GST (CGST) कायद्यानुसार अधिसूचित संस्थांना आता 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त वस्तू आणि सेवा पुरवठा केल्यास 1 टक्के TDS द्यावा लागणार आहे. त्याशिवाय राज्यांनाही राज्य कायद्यांअतर्गत 1 टक्के TDS लावावा लागणार आहे.
बीएसई व्यवहार शुल्कात सूट-
मुंबई शेअर बाजार अर्थात बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) 1 ऑक्टोबरपासून कमोडिटी डेरिवेटिव्समध्ये व्यवहार सुरु करत आहे. त्यामुळे पहिल्या वर्षात व्यवहार शुल्क अर्थात ट्रान्झॅक्शन फी न घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
PNB कडून कर्ज घेणं महागणार -
पंजाब नॅशनल बँकेने छोट्या आणि दीर्घ मुदतीच्या कर्जावरील एमसीएलआर दरांत वाढ झाली आहे. त्यामुळे पंजाब नॅशनल बँकेकडून कर्ज घेणं महागणार आहे. नवे दर आजपासून लागू होणार आहेत.
1 ऑक्टोबरपासून 7 नवे नियम लागू