रांची : झारखंडमधील गढवा जिल्ह्यातील छिंजो भागात नक्षली हल्ल्यात सहा सशस्त्र दलाचे जवान शहीद झाले आहेत, तर चार जवान जखमी आहेत. नक्षलवाद्यांनी केलेल्या गोळीबाराता या जवानांचा मृत्यू झाला, तर भूसुरुंगात इतर जवान जखमी झाले.

कडेकोट सुरक्षा व्यवस्था पाहताच नक्षलवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरु केला, ज्यामध्ये सहा जवान शहीद झाले. गोळीबाराच्या घटनेदरम्यानच भूसुरुंगाचा स्फोटही झाला, अशी माहिती आहे.

गढवा जिल्ह्याचे पोलीस उपमहानिरीक्षक विपुल शुक्ला यांनी दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात चार जवान जखमी आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या घटनेनंतर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली असून नक्षलवाद्यांसोबत चकमक सुरु आहे.

दरम्यान, यापूर्वीही राज्यातील गडचिरोली आणि छत्तीसगड राज्यातील सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांसोबत पोलिसांची चकमक झाली होती. सुकमा हल्ल्यात नऊ जवान शहीद झाले होते, तर सहा जण जखमी झाले होते. त्यानंतर हा आणखी एक मोठा हल्ला करण्यात आला आहे.