मुंबई : अलीकडेच झालेल्या राज्यसभा निवडणुकीत निवडून गेलेल्या 57 खासदारांपैकी 55 खासदार कोट्यधीश असल्याचं निरीक्षण एडीआर या निवडणूक सुधारणेसाठी काम करणाऱ्या संस्थेने काढलाय. एडीआर-इलेक्शन वॉच या स्वयंसेवी संस्थेने जारी केलेल्या आकडेवारीतून ही माहिती पुढे आलीय.


 
एडीआर म्हणजे असोशिएशन फॉर डेमॉक्रॅटिक रिफॉर्म्स... ही संस्था प्रत्येक निवडणुकीपूर्वी आणि नंतर निवडून गेलेल्या सदस्याच्या संपत्तीचा तसंच गुन्हेगारी पार्श्वभूमीचं विश्लेषण करते. हे विश्लेषण प्रामुख्याने या आमदार-खासदारांनी स्वतःहून निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रांच्या आधारेच केलं जातं.

 
परवाच झालेल्या राज्यसभा निवडणुकीनंतर केलेल्या विश्लेषणानंतर निवडून गेलेल्या 57 खासदारांपैकी तब्बल 13 खासदारांची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची किंवा त्यांच्यावर वेगवेगळ्या पोलिस स्टेशन्समध्ये गुन्ह्यांची नोंद असल्याचा निष्कर्षही एडीआर-इलेक्शन वॉचने काढलाय.

 
नवनिर्वाचित 57 खासदारांपैकी 55 खासदार कोट्यधीश आहेत म्हणजे, टक्केवारीच्या भाषेत जवळपास 96 टक्के खासदार कोट्यधीश आहेत. तर त्यांच्या कडील संपत्तीची सरासरी ही रूपये 35.8 कोटी एवढी प्रचंड आहे.

 
महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब म्हणजे... या सर्वाधिक श्रीमंत खासदारांच्या यादीत पहिला नंबर महाराष्ट्रातून राष्ट्रवादीच्या तिकीटावर राज्यसभेत पोहोचलेल्या खासदारांनी पटकावलाय. त्याचं नाव आहे.. प्रफुल्ल पटेल. पटेल यांनी 252 कोटी रूपयांची संपत्ती असल्याची माहिती आपल्या उमेदवारी अर्जासोबत दिलेल्या प्रतिज्ञापत्रात दिलीय. पटेल यांच्यानंतरचा दुसरा नंबर काँग्रेसच्या कपिल सिब्बल यांचा आहे. त्यांच्याकडे 212 कोटी रूपयांची संपत्ती आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर बहुजन समाज पार्टीचे खासदार सतीश चंद्र मिश्र आहेत. त्यांच्याकडे तब्बल 193 कोटींची संपत्ती आहे.

 
राज्यसभेतील सर्वाधिक श्रीमंत असलेल्या पहिल्या तीन खासदारांची माहिती घेतल्यानंतर सर्वात कमी संपत्ती असलेले नवनिर्वाचित खासदार कोण हे पाहणंही उत्सुकतेचं ठरेल. तर सर्वात कमी संपत्ती असल्याचं निवडणूक प्रतिज्ञापत्रातून सांगणारे खासदार आहेत भाजपचे अनिल माधव दवे... माधव यांची संपत्ती अवघी 60 लाख रूपयांची आहे. पण आश्चर्याने तोंडात बोट घालायला लावणारी बाब म्हणजे त्यांच्या संपत्तीत मागच्या सहा वर्षात झालेली वाढ... सहा वर्षांपूर्वी त्यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांच्याकडे फक्त पावणेतीन लाख रूपयांची संपत्ती होती...

 
राज्यसभेवर अलीकडेच निवडून गेलेल्या 57 खासदारांपैकी सर्वाधिक 17 भाजपचे तर त्या खालोखाल 9 काँग्रेसचे आहेत. त्याशिवाय समाजवादी पार्टीचे सात, एआयडीएमके चे चार आणि बीजू जनता दलाचे तीन खासदार आहेत. त्याबरोबरच संयुक्त जनता दल, राष्ट्रीय जनता दल, द्रमुक, बहुजन समाज पार्टी आणि तेलुगू देसम यांचे प्रत्येकी दोन खासदार आहेत. तसंच शिरोमणी अकाली दल, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि वायएसआर काँग्रेसचे प्रत्येकी एक खासदार आहे. त्याशिवाय एक अपक्ष खासदारही या 57 नवनिर्वाचित राज्यसभा सदस्यांमध्ये आहे.

 
या नवनिर्वाचित 57 खासदारांपैकी कोट्यधीश असलेल्या 55 जणांपैकी 15 खासदार सत्ताधारी भाजपचे आहेत तर भाजपच्या या 17 खासदारांची सरासरी संपत्ती ही 17.9 कोटींच्या घरात जाते. काँग्रेसच्या 9 खासदारांची सरासरी संपत्ती ही 65.5 कोटी तर समाजवादी पार्टीच्या सात खासदारांची सरासरी संपत्ती ही 38 कोटी आहे. अखिल भारतीय अण्णा द्रमुक म्हणजे जयलललितांच्या चार खासदारांची सरासरी संपत्ती 6.8 कोटी तर बीजू जनता दलाच्या तीन खासदारांकडे असलेल्या संपत्तीची सरासरी ही 15 कोटींच्या घरात आहे.

 
या 57 नव्या खासदारांपैकी 13 खासदारांनी त्यांच्यावर गुन्हेगारी स्वरूपाच्या गुन्ह्यांची नोंद झाल्याची माहिती प्रतिज्ञापत्रातून दिलीय तर त्यातील सात जणांविरूद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. या गंभीर गुन्ह्यांमध्ये खुनाचा प्रयत्न आणि फसवणूक तसंच बनावटगिरी करून प्रॉपर्टी हडपण्याचा प्रयत्न असे काही गुन्हे आहेत.

 
स्वतःच्या गुन्ह्यांचा तपशील देणाऱ्या 13 खासदारांपैकी तीन भाजपचे तर दोन समाजवादी पार्टीचे आहेत. त्याशिवाय काँग्रेस, बीजू जनता दल, बसपा, राजद, द्रमुक, शिवसेना आणि वायएसआर काँग्रेस या पक्षांचा प्रत्येकी एका खासदारानेही त्यांच्याविरूद्ध नोंदवण्यात आलेल्या गुन्ह्यांचा तपशील दिलाय.

 
या खासदारांच्या शैक्षणिक पात्रतेचा आढावा घेतला तर असं दिसतं की तीन खासदाराचं शिक्षण दहावी ते बारावीच्या दरम्यान आहे आणि 33 खासदार हे व्यावसायिक पदवीधर किंवा फक्त पदवीधर आहेत. तसंच 18 खासदार हे पदव्युत्तर पदवीधर तर दोन पीएचडी धारक आहेत.

 
या नवनिर्वाचित 57 खासदारांच्या वयोगटाचा विचार केला तर 25 खासदार हे 41 ते 60 या वयोगटातील आहेत तर 31 खासदार हे 61 ते 80 या वयोगटातील आहेत.

 
या 57 खासदारांपैकी फक्त चार महिला आहेत.