नवी दिल्ली : नोटाबंदीनंतर बँकेत अडीच लाखांहून अधिक पैसे जमा करणारे आणि त्या पैशांचा स्त्रोत न सांगणारे तब्बल 18 लाख नागरिक आढळून आले आहेत. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी राज्यसभेत ही माहिती दिली.
वेगवेगळ्या प्रकरणात 5400 कोटी रुपयांची बेहिशेबी संपत्ती पुढे आल्याचंही जेटलींनी म्हटलं आहे. नोटाबंदीनंतर नेमकी किती रक्कम बँकेत जमा झाली, याची छाननी आरबीआयकडून सुरु असून लवकरच ती आकडेवारी पुढे येईल, असंही ते म्हणाले.
काळा पैसा धारकांविरोधात काय कारवाई करण्यात आली, प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये जमा करण्याच्या आश्वासनाचं काय झालं, असा सवाल समाजवादी पक्षाचे खासदार नरेश अग्रवाल यांनी केला होता. यावर उत्तर देताना काळ्या पैशाविरोधात आतापर्यंत कोणत्याच सरकारने इतक्या मोठ्या प्रमाणावर कारवाई केली नसल्याचा दावाही यावेळी जेटलींनी केला.
9 नोव्हेंबर 2016 ते 10 जानेवारी 2017 या दोन महिन्यांच्या कालावधीत आयकर विभागाने अकराशे पेक्षा जास्त सर्वेक्षण आणि शोध मोहिमा झाल्याची माहितीही जेटलीनी दिली. 610 कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली असून त्यात 513 कोटींच्या रकमेचा समावेश आहे.