सुरत (गुजरात) : शाळेची फी न भरल्याने सात वर्षीय विद्यार्थ्याला ओलीस ठेवल्याची खळबळजनक घटना गुजरातमधील सुरत शहरात घडली. हे प्रकरण पोलिसांपर्यंत गेल्यानंतर विद्यार्थ्याची शाळेतून सुटका करण्यात आली.


सात वर्षीय दिव्येश सुरतमधील उमरा परिसरातील पीआर खाटीवाला स्कूलमध्ये सिनियर केजीमध्ये शिकतो.

दिव्येशच्या आई-वडिलांचा असा आरोप आहे की, “फी न भरल्याने शाळेकडून दिव्येशला ओलीस ठेवण्यात आले. जोपर्यंत फी भरत नाही, तोपर्यंत मुलाला सोडणार नाही, अशी शाळेने भूमिका घेतली होती.”



जेव्हा दिव्येशला शाळेने सोडण्यास नकार दिला, त्यावेळी पालकांनी पोलिसांची मदत घेतली. त्यानंतर पोलिस आणि दिव्येशचे पालक मिळून शाळेत पोहोचले आणि दिव्येशला सोडवलं.

शाळेच्या प्रशासनाने मात्र दिव्येशला ओलीस ठेवल्याचे आरोप फेटाळले.

काही दिवसांपूर्वीच खासगी शाळांमधील प्रवेश शुल्कावर नियंत्रणाबाबत हालचाली सुरु केल्या होत्या. त्याचवेळी सुरत शहरात फीसाठी विद्यार्थ्याला ओलीस ठेवण्याची घटना समोर आली. शिवाय, खासगी शाळांच्या मनमानीचा मुद्दाही या निमित्ताने पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.