बंगळुरु: अवैधरित्या खाणकामप्रकरणी साडेतीन वर्ष जेलवारी केलेले भाजपचे माजी मंत्री जनार्दन रेड्डींच्या मुलीच्या लग्न सोहळ्याची सध्या बंगळुरूत चर्चा आहे. या लग्नासाठी एक दोन नव्हे तर तब्बल 500 कोटींचा खर्च करण्यात आला आहे.
आज जनार्दन रेड्डी यांच्या मुलीचा विवाहसोहळा आहे. रेड्डींची मुलगी ब्राम्हीणी हिचा आंध्रप्रदेशमधल्या एका उद्योगपतीशी विवाह होणार आहे. या विवाह सोहळ्यासाठी रेड्डींनी शहरातल्या आलिशान हॉटेलमध्ये जवळपास १५०० खोल्या आरक्षित केल्या आहे. या विवाहसोहळ्याला ३० हजारांहून अधिक वऱ्हाडी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. इतकेच नाही तर काही व्हीआयपी पाहुण्यांसाठी १५ हॅलीपॅडही उभारण्यात आले आहेत.
विवाह सोहळ्यासाठी खास राजा कृष्णदेवराय यांच्या महालाची, हम्पीमधल्या विजय विठ्ठल मंदिराची प्रतिकृती देखील उभारली आहे. या भव्य दिव्य विवाह सोहळ्यासाठी हत्ती, घोडे, उंट देखील आणण्यात आले आहेत. शाहरूख खानसह बॉलीवूडमधले अनेक बडे कलाकारही या लग्न सोहळ्यात उपस्थित राहण्याची देखील चर्चा आहे.