नवी दिल्ली : सीबीआय विरुद्ध सीबीआय या वादात रोज नाट्यमय घडामोडी घडत आहेत. कालचा दिवस मध्यरात्रीच झालेल्या तडकाफडकी बदल्यांमुळे गाजला, तर आज चक्क सीबीआय प्रमुखांच्या घरावर आयबीचे चार लोक पाळत ठेवताना पकडले गेले आहेत. दिल्लीतल्या 6 जनपथ रोडवर हे सीबीआय हाऊस, सध्याचे महासंचालक आलोक वर्मा यांचं हे निवासस्थान आहे. इथून 100 मीटर अंतरावर दोन चारचाकी गाड्यांमधून चार लोक पाळत ठेवून होते. सकाळी साडेसातवाजता ही बाब वर्मांच्या वैयक्तिक सुरक्षा अधिकाऱ्याला समजली, तेव्हा त्यांनी या चार जणांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं.
हे चारही जण काल मध्यरात्रीपासूनच आलोक वर्मांच्या घराबाहेर पाळत ठेवून होते. सकाळी पीएसओला याची कुणकुण लागल्यानंतर त्यांनी जेव्हा त्यांची चौकशी करायचा प्रयत्न केला, तेव्हा ते तिथून पळ काढायला लागले. सुरुवातीला त्यांनी आयबीचे अधिकारी असल्याचं सांगितलंच नाही. पण जेव्हा पीएसओने पकडून त्यांना आतमध्ये नेलं तेव्हा त्यांनी ही कबुली दिली. धीरज कुमार (दावा- ज्युनिअर इन्टेलिजन्स ऑफिसर), अजय कुमार (दावा-ज्युनिअर इन्टेलिजेन्स ऑफिसर), प्रशांत कुमार (दावा- असिस्टंट कंटेन्ट ऑफिसर), विनीत कुमार (दावा- असिस्टंट कंटेन्ट ऑफिसर) अशी या चौघांची नावं आहेत. त्यांच्याकडून तीन मोबाईल फोन आणि आयपॅड जप्त केले आहेत.
सुरुवातीला तर हे आयबीचे लोकच नाहीत असा दावा सुरु झाला होता. मात्र त्यांची नावं समोर आल्यानंतर इतरही अनेक डिटेल्स बाहेर येऊ लागले. त्त्यामुळे हे आयबीचेच लोक आहेत यावर शिक्कामोर्तब झालं. नंतर आयबीकडून स्पष्टीकरण आलं की हे लोक त्यांची रुटीन डयुटी करत होते. ज्या ज्या ठिकाणी काही वेगळी हालचाल दिसते, त्या ठिकाणी थांबून निगराणी करणं हे त्यांचं काम आहे.
सक्तीच्या रजेवर पाठवल्यानंतर आलोक वर्मा आता सरकारविरोधात संघर्षाच्या पवित्र्यात आहेत. त्यामुळेच त्यांच्या निवासस्थानी कोण कोण भेटायला येतंय याची पाहणी करण्यासाठीच हे चार जण पाळत ठेवून होते अशी शक्यता आहे. आयबीचे अधिकारी एखाद्या स्पेशल ऑपरेशनवर असतील तर ते सोबत खरं आयकार्ड घेऊन फिरत नाहीत. त्यामुळेच आलोक वर्मांवर पाळत ठेवण्यासारखी नेमकी काय भीती सरकारला सतावतेय हा प्रश्न उपस्थित होत आहे.
सीबीआयमधील अंतर्गत वादाचं मूळ असलेला मोईन कुरेशी कोण आहे?
सरकारने ज्या पद्धतीने तडकाफडकी सक्तीच्या रजेवर पाठवलं, त्याविरोधात आलोक वर्मा हे सुप्रीम कोर्टात गेले आहे. उद्या या याचिकेवर सुनावणीही होत आहे. सीबीआय ही स्वतंत्र संस्था आहे. काल ज्या पद्धतीने या संस्थेतले अधिकारी बदलले गेले ते योग्य होतं की नाही याचा फैसला उद्या होईलच. पण ज्या आयबीचं काम देशविघातक कारवाया रोखण्यासाठी हेरगिरी करणं असतं, तेही आता राजकारणासाठी एखाद्याच्या घराबाहेर, रस्त्यावर वापरले जाऊ लागले आहेत. देशाच्या सुरक्षा यंत्रणांची ही अवस्था खरंच चिंता करण्यासारखी आहे.
संबंधित बातम्या