धमकीच्या पत्रात म्हटले आहे की, बाबरी पक्षकार व्यवस्थित वागले तर त्यांची गळाभेट घेतली जाईल, मात्र असं झालं नाही तर त्यांना सीमेपार पाठविले जाईल. पोलिसांच्या माहितीनुसार पत्र पाठविणाऱ्या सूर्यप्रकाशने देखील पत्र दिल्याचे कबुल केले आहे. अंसारी यांना हे पत्र कुरियरने मिळाले. त्यांनी हे वाचल्यानंतर ते घाबरले आणि पोलिसांना या विषयी माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत सूर्यप्रकाशला अटक केली.
या पत्रामुळे अंसारी आणि त्यांना परिवार दहशतीखाली आला असून त्यांनी चौकशीची मागणी केली आहे. काही दिवसांपूर्वीच यांनी योगी सरकारकडे सुरक्षेची मागणी केली होती. हे पत्र मिळाल्यांनतर अंसारी यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. विशेष म्हणजे अंसारी यांनी अयोध्येत आपल्याला कुठलाही धोका नसल्याचे सांगितले असून बाहेरचे लोक धमकावत असल्याचे सांगितले आहे.
बाबरी मशिद-रामजन्मभूमी वादाच्या खटल्यातील पक्षकारांपैकी एक असलेल्या हाशिम अन्सारी यांचं निधन झाल्यानंतर त्यांचे पुत्र इक्बाल अन्सारी हा खटला लढवीत आहेत. हाशिम अन्सारी 60 वर्षांहून अधिक काळ बाबरी मशिदीसाठी कायदेशीर लढाई लढत होते. परंतु तरीही अन्सारी यांचे स्थानिक हिंदू साधू-संतांसोबतचे संबंध कधीही बिघडले नव्हते. अयोध्येतील रामजन्मभूमी आणि बाबरी मशिदीचा वाद 1949 पासून सुरु आहे.