30 November In History : दुसऱ्या महायुद्धाच्या काळात दोस्त राष्ट्रामधील महत्त्वाचे नेते आणि ब्रिटनचे पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांचा जन्म आजच्याच दिवसाचा. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात त्यांनी चिकाटीने लढा देऊन त्यांनी नाझी जर्मनीच्या हिटलरचा पराभव केला. तसेच भारतीय विज्ञानासाठीही आजचा दिवस महत्त्वाचा आहे. आजच्याच दिवशी सर जगदीश चंद्र बोस यांचाही जन्म झाला होता. 


1731 : चीनमध्ये भूकंप, एक लाख लोकांचा मृत्यू


चीनच्या बीजिंगला झालेल्या भूकंपात एक लाख लोक मरण पावले होते. हा खूप मोठा भूकंप मानला गेला होता. मात्र त्यानंतरही चीनमध्ये यापेक्षा मोठा भूकंप झालेला. 28 जुलै 1976 रोजी चीनच्या हेबेई प्रांतात भूकंप झाला आणि तांगशान शहर समतल झाले. यात 255,000 लोक मरण पावले होते.  


1858 : जगदीशचंद्र बोस यांचा जन्म (Jagadish Chandra Bose) 


नोबेल पारितोषिक विजेते भारतीय वनस्पतीशास्त्रज्ञ जगदीशचंद्र बोस यांचा जन्म आजच्याच दिवशी झालेला.  वनस्पतींमधील प्रतिक्षिप्त क्रियांवर मूलभूत संशोधन करणाऱ्या जगदीशचंद्र बोस यांनी संशोधन क्षेत्रात भारताचं नाव जगाच्या नकाशावर झळकावलं.  जगदीशचंद्र बोस हे एक भारतीय जीवशास्त्रज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ, वनस्पतीशास्त्रज्ञ तसेच पुरातत्त्वज्ञ होते. भारतीय महान शास्त्रज्ञ जगदीशचंद्र बोस यांचे वनस्पती विषयावरील कार्य खूप मोठे आहे. 23 नोव्हेंबर 1937 साली त्यांचा मृत्यू झाला. 


1874 : विन्स्टन चर्चिल यांचा जन्म (Winston Churchill) 


दुसर्‍या महायुद्धकाळातील ब्रिटनचे पंतप्रधानपद भूषवलेल्या विन्स्टन चर्चिल यांचा जन्म आजच्याच दिवशी झालेला. राजकीय नेता असण्यासोबत ते साहित्यिक, वृत्तपत्रकार आणि नोबेल पारितोषिक विजेते देखील होते. त्यांची एक खास ओळख नेहमी सांगितली जाते.  विजयी झाल्यावर दोन बोटांनी 'V' दाखवण्याची पद्धत इंग्लंडचे पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांनी सर्वप्रथम लोकप्रिय केली. दुसर्‍या महायुद्धाची घोषणा झाल्यानंतर विन्स्टन चर्चिल यांनी संसदेत ऐतिहासिक भाषण केले. त्यात इंग्लंडचे अंतिम ध्येय फक्त विजय असेल हे सांगताना त्यांनी आवेशात दोन बोटे उंचावून ‘V’ हे विजयचिन्ह दर्शविले. तेव्हापासून व्ही फॉर व्हिक्ट्री हे चिन्ह दर्शवले जात आहे. 24 जानेवारी 1965 रोजी त्यांचा मृत्यू झाला. 


1900: आयरिश लेखक ऑस्कर वाईल्ड यांचा मृत्यू  


ऑस्कर फिंगल ओ'फ्लॅहर्टी विल्स वाइल्ड हे एक आयरिश नाटककार, कादंबरीकार, कवी आणि कथालेखक होते. त्यांचा जन्म 16 ऑक्टोबर 1854 साली झाला होता. अत्यंत कमी वयात त्यांचं निधन झालं. मात्र एवढ्या आयुष्यात त्यांनी केलेलं लेखन त्यांना अजरामर करुन गेलं. आपल्या लेखणीने संपूर्ण जगात खळबळ माजवणाऱ्या व्यक्तीचे नाव म्हणजे ऑस्कर वाइल्ड. शेक्सपियरनंतर ऑस्कर वाइल्ड यांचंच नाव घेतलं जातं.  त्यांच्या लेखनात जीवनाचे सखोल अनुभव, नात्यांचे रहस्य, पवित्र सौंदर्याचे विवेचन, मानवी संवेदनांच्या कथा आहेत.


1910 : कविवर्य बा. भ. बोरकर यांचा जन्मदिवस 


1931 : भारतीय इतिहासकार रोमिला थापर यांचा जन्म आजच्याच दिवशी झालेला. रोमिला थापर या प्राचीन भारतीय इतिहासाचे बहुमोल संशोधन करणाऱ्या भारतीय इतिहासकार आहेत. त्यांनी भारतीय इतिहासाचे पुनर्लेखन करून ऐतिहासिक दृष्टीकोन मांडला. प्राचीन भारत व मौर्यकाळ याविषयीचे त्यांचे संशोधन मोलाचे आहे. त्यांची ऐतिहासिक विषयांचा धांडोळा घेणारी अनेक पुस्तकं चर्चेत आहेत. 


1935: आनंद यादव यांचा जन्म


मराठी साहित्यातील प्रसिद्ध लेखक आनंद यादव यांचा जन्म आजच्याच दिवशी कागलमध्ये झाला होता. काव्य, कथा, कादंबरी, समीक्षा, ललित अशा विविध साहित्यप्रकारांत त्यांनी लेखन केले. ग्रामीण साहित्य संमेलन, समरसता साहित्य संमेलन आदी संमेलनांचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले. त्यांच्या झोंबी या आत्मचरित्रासाठी 1990 मध्ये त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. आनंद यादव यांनी सुमारे 40 हून अधिक पुस्तके लिहिली आहेत.  27 नोव्हेंबर 2016 रोजी त्यांचा मृत्यू झाला.


1996 : पु. ल देशपांडेंना पहिला 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार


मराठी साहित्यातील एक सिद्धहस्त लेखणी असलेलं नाव म्हणजे ख्यातनाम साहित्यिक पु. ल. देशपांडे. आजच्याच दिवशी पुलंना महाराष्ट्र सरकारचा पहिला 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. हा पुरस्कार महाराष्ट्र राज्याचा सर्वोच्‍च पुरस्कार आहे.


2000: बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा आजच्याच दिवशी मिस वर्ल्ड बनली होती. प्रियांकानं त्यानंतर बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. काही वर्षांपूर्वी तिनं निक जोनाससोबत लग्न केलं.  


2012 : देशाचे 12 वे पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल यांचं निधन (Inder Kumar Gujral) 


भारताचे 12 वे पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल यांचं आजच्याच दिवशी निधन झालं होतं.  त्यांचा जन्म सध्याच्या पाकिस्तानातील पंजाब प्रांतात असलेल्या झेलम या शहरात झाला होता. त्यांनी  1942 च्या चलेजाव चळवळीत भाग घेतला होता त्याबद्दल त्यांना तुरूंगवासही झाला. फाळणीनंतर ते भारतात स्थायिक झाले होते. त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात दिल्ली महानगरपालिकेपासून झाली. 1997 रोजी संयुक्त आघाडी सरकारला बाहेरून पाठिंबा देणाऱ्या काँग्रेस पक्षाने पाठिंबा काढून घेतला आणि देवेगौडा सरकार कोसळले. त्यानंतर काँग्रेस पक्ष आणि काही विरोधी पक्षांची संयुक्त आघाडी यांच्यादरम्यान तडजोड झाली.


महत्त्वाचे निर्णय घेताना आपल्याला डावलले जाणार नाही या अटीवर, काँग्रेस पक्षाने संयुक्त आघाडीने बनवलेल्या सरकारला नव्या नेत्याचा नेतृत्वाखाली पाठिंबा द्यायचे मान्य केले. संयुक्त आघाडीने इंद्रकुमार गुजराल यांना नेतेपदी नेमले आणि 21 एप्रिल 1997 रोजी त्यांचा भारताचे पंतप्रधान म्हणून शपथविधी झाला.  गुजराल पंतप्रधानपदी 11 महिने राहिले. त्यापैकी 3 महिने ते काळजीवाहू पंतप्रधान होते.1999 नंतर इंद्रकुमार गुजराल सक्रिय राजकारणातून निवृत्त झाले.


ही बातमी वाचा: