रायगड : बदलत्या राजकीय परिस्थितीनुसार भूमिका घ्याव्या लागतात, आम्ही वरिष्ठांना सांगत होतो, पण त्यांनी ऐकलं नाही. नितीश कुमार, ममता बॅनर्जी आणि जयललिता यांनीही आपली भूमिका बदलली होती असं सांगत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी शरद पवारांना (Sharad Pawar) टोला लगावला. ते रायगडमधील कर्जत या ठिकाणी पक्षाच्या कार्यक्रमात बोलत होते. 


अजित पवार म्हणाले की, लोकशाहीत काम करताना बहुमताचा आदर करावा लागतो. हे आम्ही आमच्या वरिष्ठांना सांगत होतो. पण आमचं ऐकलं नाही. राजकीय भूमिका घ्याव्या लागतात. नितीश कुमार, जयललिता, ममता बॅनर्जी यांनीही त्या त्या राजकीय परिस्थितीनुसार भूमिका घेतल्या. राज्यात देखील अनेकवेळा काही भूमिका घेण्यात आल्या होत्या. त्यामुळं परिस्थितीनुसार निर्णय घ्यावा लागतो. त्यामुळे आपण देखील निर्णय घेतला आहे. निवडणूक काळात नम्रतने सामोरे जायला हवं. सत्तेतून लोकांची कामं करणं ही आमची भूमिका आहे. हातावर हात ठेऊन विरोध करत राहणं हे आमची भूमिका नाही.


आम्ही काही साधू संत नाही


अजित पवार म्हणाले की, काहीजण विचार करत असतील ही भूमिका का घेतली? आम्ही साधू संत नाहीं देशपातळीवर पाहिलं तर वेगवेगळे राजकिय पक्ष, वेगळ्या विचारसरणी सोबत जातात. परंतु स्वतःची विचारधारा सोडत नाहीत. आम्ही कुठल्याही समाजाला त्रास होऊ नये, त्यांनी एकोप्याने राहावं यासाठी प्रयत्न करत आहोत. सध्या राज्यांत वेगळं वातावरण आहे. प्रत्येकाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. संविधानाने तो अधिकर दिला आहे. परंतु त्यांनी लक्षात घ्यावं कुणालाही त्रास होऊ नये.


अलिकडच्या काळात विरोधी पक्षाचे लोक रोज काहीतरी बोलत असतात, आपण प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्यासाठी बांधील नाही. आपण लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी बांधील आहोत असंही अजित पवार म्हणाले. 


यशवंतराव चव्हाणांचा विचार घेऊन सत्तेत जाता आलं तर बिघडलं कुठे? 


आपली विचारधारा पक्की ठेऊन जर आपल्याला काम करता येत असेल, यशवंतराव चव्हाण यांचा विचार घेऊन पुढे घेऊन जाता येत असेल तर मग सत्तेत सहभागी झालो तर बिघडलं कुठं? असा सवालही त्यांनी विचारला. ते म्हणाले की, आगामी काळात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका होणारं आहेत. मधल्या काळात काही राजकीय बदल झाले. परंतु आता काम करत असताना यशवंतराव चव्हाण यांनी सांगितलेल्या, सत्तेतून बहुजन समाजाचा विकास या मार्गावर आपण चाललो आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या योजना शेवटच्या लोकांपर्यत पोहचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. 


मराठा समाज मागण्याबाबत राजकीय पक्षांची बैठक घेतली. इतरांना दिलेल्या आरक्षणाला धक्का न लागता आरक्षण दिलं जावं अशी भूमिका घेण्यात आली आहे असं अजित पवार म्हणाले. काही दिवसांपूर्वी आजारी होतो, मला राजकीय आजार झाला अशी चर्चा झाली, पण मी लेचापेचा नाही असं अजित पवार यांनी ठणकावून सांगितलं. 


मंत्रिमंडळात महिलांना संधी


पाठीमागच्या काळात मंत्रिमंडळात महिलांना संधी देण्यात आली नव्हती. मात्र मी आदिती तटकरे यांच्या माध्यमातून ती संधी दिली आहे. आज मंत्रालयात येणाऱ्या नागरिकांना आपलं काम होतंय याचा विश्वास वाटला पाहिजे, त्यासाठी आम्ही दिवसरात्र काम करत आहोत असं अजित पवार म्हणाले. 


ही बातमी वाचा: