नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास यंत्रणा आपल्या तीन अधिकाऱ्यांची लाच घेतल्याप्रकरणी चौकशी करत आहे. एनआयएच्या तीन अधिकाऱ्यांवर टेरर फण्डिंग प्रकरणात लाच मागितल्याचा आरोप आहे. दिल्लीच्या एका व्यावसायिकाचं नाव सामील न करण्यासाठी दोन कोटी रुपयांची लाच मागितल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. एनआयएने या तिन्ही अधिकाऱ्यांची बदली केली आहे. हे प्रकरण पाकिस्तानची दहशतवादी संघटना जमात-उद-दावाचा म्होरक्या आणि मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदशी संबंधित आहे.


तिन्ही अधिकाऱ्यांना एनआयएबाहेर पाठवलं
लाच मागणाऱ्या तीन अधिकाऱ्यांमध्ये एनआयएच्या पोलिस अधीक्षकाचाही समावेश असून तो 2007 च्या समझोता स्फोटाच्या तपासात सहभागी होता. तर दोघांपैकी एक सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक तर दुसरा फिंगर प्रिंट एक्सपर्ट आहे. हे तिघे फलाह-ए-इंसानियत फाऊंडेशनची (एफआयएफ) चौकशी करत होते. ही संस्था हाफिज सईदची आहे. लाच मागितल्याची तक्रार मिळाल्याचं एनआयएनेही अधिकृतरित्या मान्य केलं आहे. तिन्ही अधिकाऱ्यांना एनआयएबाहेर पाठवलं असून पोलिस उपमहानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यामार्फत चौकशी सुरु असल्याचं एनआयएच्या प्रवक्त्यांनी सांगितलं.

तक्रारीबाबत NIA गंभीर
"याबाबत एक महिन्यापूर्वीच तक्रार मिळाली होती. आरोपात तथ्य आहे की नाही हे चौकशीनंतरच स्पष्ट होईल. एनआयए अशा तक्रारींकडे गांभीर्याने पाहतं. प्राथमिक कारवाई म्हणून या अधिकाऱ्यांची एनआयएच्या बाहेर बदली करण्यात आली आहे. याचा अर्थ त्यांच्यावरील आरोप योग्य आहेत, असा नाही. तपासाच्यावेळी काही पावलं उचलली जातात. तपास अद्याप पूर्ण झालेला नाही. पण कोणीही लाच स्वीकारलेली नाही," असं एनआयएच्या अधिकाऱ्याने सांगितलं.

दहशतवादी जाळं तयार करण्याचं प्रकरण
फलाह-ए-इंसानियतचा उपप्रमुख शाहिद महमूद आणि आणखी एकाविरोधात दिल्ली आणि हरियाणामध्ये दहशतवादी जाळं तयार करण्याच्या आरोपात एनआयएने मागील वर्षी गुन्हा दाखल केला होता. एनआयएने या प्रकरणात सुरुवातीला मोहम्मद सलमान आणि मोहम्मद सलीम या दोघांना अटक केली होती. हे दोघेही दिल्लीचे रहिवासी होते. यानंतर राजस्थानच्या नागौरमध्ये राहणाऱ्या मोहम्मद हुसैन मोलानीलाही अटक करण्यात आली होती. यावर्षी जुलै महिन्यात एनआयएने यूएईमधून मोहम्मद आरिफ गुलाम बशीर धरमपुरियाचं यशस्वी प्रत्यार्पण केलं होतं. तो गुजरातच्या वलसाडमधील व्यायसायिक आहे. एनआयएने आतापर्यंत हाफिज सईदसह अन्य आरोपींविरोधात दोन आरोपपत्र दाखल केले आहेत.

काय आहे टेरर फण्डिंग प्रकरण?
भारतात पैशांच्या फण्डिंगबाबत राष्ट्रीय तपास यंत्रणा पाकिस्तानशी संबंधित दहशतवादी संघटना फलाह-ए-इंसानियत फाऊंडेशनची (एफआयएफ) चौकशी करत आहे. एफआयएफचा संबंध हाफिज सईदच्या लष्कर-ए-तोयबा या अतिरेकी संघटनेशी आहे. मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये अटकेत असलेल्या मोहम्मद सलमानच्या चौकशीत एनआयएला समजलं होतं की, हरियाणा आणि राजस्थानच्या काही मदरशांसाठी पाकिस्तानमधून पैसा आला होता.

चौकशीत सलमानने सांगितलं की, "तो हरियाणाच्या पलवलमधील उठावर गावात एक मशीद बनवत होता. यासाठी एफआयएफने फण्डिंग केलं होतं. सोबतच दुबईवरुन दहशतवादी हाफिज सईदची संस्थाही यासाठी पैसा पुरवत होती."

एनआयएनुसार, "परदेशांमध्ये एफआयएफ सदस्यांकडून दिल्लीमधील अनेक लोकांनी पैसे घेतले आणि त्याचा उपयोग दहशतवादी कारवायांमध्ये केला. या प्रकरणात मोहम्मद सलमान (वय 52 वर्ष), मोहम्मद सलीम (वय 62 वर्ष), श्रीनगरच्या सज्जाद अब्दुल वानी (वय 34 वर्ष) यांना अटक झाली आहे"