एसबीआय लवकरच डेबिट कार्ड हद्दपार करणार
एबीपी माझा वेब टीम | 20 Aug 2019 10:45 AM (IST)
स्टेट बँक ऑफ इंडियाने या वर्षी मार्च महिन्यात 'योनो कॅशपाईंट्स' सेवा सुरु केली आहे, ज्यामधून ग्राहक डेबिट कार्डच्या वापराशिवाय पैसे काढू शकतात. ही अतिशय सोपी आणि सुरक्षित सेवा आहे.
मुंबई : भारतातील मोठी आणि सर्वाधिक शाखा असलेली स्टेट बँक ऑफ इंडिया अर्थात एसबीआय डिजिटल पेमेंटला अधिक प्रोत्साहन देण्साठी नवं पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. एसबीआय बँकिग प्रणालीतून डेबिट कार्ड हद्दपार करण्याचा विचार करत आहे. देशातील बहुतांश एसबीआय ग्राहक डेबिट कार्डवर अवलंबून आहेत, मात्र तरीही बँकेने या निर्णयाची तयारी केली आहे. "डेबिट कार्ड हद्दपार करण्याचा आमचा इरादा आहे आणि आम्ही ते नक्कीच करु," असं बँकेचे चेअरमन रजनीश कुमार यांनी सांगितलं. रजनीश कुमार म्हणाले की, देशभरात सध्या सुमारे 90 कोटी डेबिट कार्ड आणि तीन कोटी क्रेडिट कार्ड आहेत. डेबिट कार्डलेस देश बनवण्यासाठी 'योनो' प्लॅटफॉर्मची भूमिका महत्त्वाची असेल. या 'योनो' प्लॅटफॉर्मद्वारे कार्डशिवाय एटीएममधून पैसे काढता येऊ शकतात किंवा कार्ड स्वाईप न करता खरेदी करता येऊ शकते. "बँकेने आधीच 68 हजार 'योनो' कॅशपॉईंट्स बसवले आहेत. येत्या दीड वर्षात कॅशपॉईंट्सचा हा आकडा दहा लाख करण्याची योजना आहे, जेणेकरुन कार्डचा वापर आणखीच कमी होईल. येत्या पाच वर्षात प्लास्टिक कार्डचा (डेबिट कार्ड) वापर मर्यादित होईल. तसंच येत्या काळात ग्राहकांच्या खिशातील क्रेडिट कार्ड हा 'स्टॅण्ड बाय'चा पर्याय म्हणूनच राहिल," असं रजनीश कुमार यांनी सांगितलं. स्टेट बँक ऑफ इंडियाने या वर्षी मार्च महिन्यात 'योनो कॅशपाईंट्स' सेवा सुरु केली आहे, ज्यामधून ग्राहक डेबिट कार्डच्या वापराशिवाय पैसे काढू शकतात. ही अतिशय सोपी आणि सुरक्षित सेवा आहे. सुरुवातीला ही सेवा 16 हजार 500 एटीएममध्ये उपलब्ध होती. आता बँक आपले सगळे एटीएम या सेवेने अपग्रेड करत आहे.