कोलकाता : पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामध्ये असं प्रकरण समोर आलं आहे, जे ऐकून कोणीही आश्चर्यचकित झाल्याशिवाय राहणार नाही. हे प्रकरण कोणत्याही हिंदी सिनेमापेक्षा कमी नाही. एका खासगी रुग्णालयात मुलीचा जन्म झाला. यानंतर एक नाही, दोन नाही तर तीन पुरुषांनी दावा केला की, तोच मुलीचा बाबा आहे. यानंतर प्रकरण एवढं गुतलं की रुग्णालयाने पोलिसांना बोलावलं.
21 वर्षीय तरुणीची प्रसुती
ही घटना शनिवार 20 जुलैची आहे. रुग्णालयात संध्याकाळी 6.30 वाजता एका 21 वर्षीय तरुणीला प्रसुतीसाठी आणलं होतं. तरुणीसोबत तिची आई आणि एक तरुण होता. आपण तरुणीचा पती असल्याचं सांगत तरुणाने रुग्णालयाचे सर्व आवश्यक फॉर्म भरले आणि फी देखील दिली. यानंतर तरुणीला रविवारी सकाळी प्रसुतीसाठी ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आलं, तिथे तिने एका मुलीला जन्म दिला.
थोड्या वेळाने रुग्णालयात दुसरा पुरुष आला आणि आपण तरुणीचा पती असल्याचा दावा त्याने केला. यानंतर खरा ड्रामा सुरु झाला. एका पुरुषाने आधीच तरुणीचा पती असल्याचं सांगून फॉर्मवर स्वाक्षरी केली, त्यावेळी ती लेबर रुममध्ये होती, असं रुग्णालयाने दुसऱ्या व्यक्तीला सांगितलं.
यानंतर तरुणीचा पती असल्याचा दावा करणारे दोन्ही पुरुष एकमेकांशी भिडले आणि हाणामारीपर्यंत प्रकरण पोहोचलं. रुग्णालयाने पोलिसांनी बोलावून दोघांपैकी कोणालाही तरुणीला भेटता येणार नाही, अशी तंबी दिली. पोलिस दोघांना बाहेर घेऊन गेले आणि तपास सुरु केला.
पोलिसांनी मॅरेज सर्टिफिकेट मागितलं
आपापला दावा सिद्ध करण्यासाठी पोलिसांनी दोघांना मॅरेज सर्टिफिकेट दाखवण्यास सांगितलं. रुग्णालयात नंतर पोहोचलेल्या व्यक्तीने संध्याकाळी आपलं मॅरेज सर्टिफेकेट पोलिसांना दाखवलं. मग तरुणीला रुग्णालयात घेऊन आलेल्या तरुणाने पोलिसांसमोर कबुल केलं की तो तिचा 'मित्र' आहे. परंतु हे प्रकरण इथेच संपलं नाही. रुग्णालयात उपस्थित असलेल्या तरुणीच्या आईने मॅरेज सर्टिफिकेट घेऊन आलेल्या व्यक्तीला आपला जावई मानण्यास नकार दिला. मग खरा पती कोण याची मुलीकडेच चौकशी करायची, असं पोलिसांनी ठरवलं.
पोलिसांनी तरुणीचा जबाब नोंदवण्यासाठी रविवारी (21 जुलै) सकाळी दोन्ही पुरुषांना रुग्णालयात बोलावलं. पण आणखी एका व्यक्तीने रुग्णालयात येऊन आपणच बाळाचा पिता असल्याचा दावा केल्याने या प्रकरणात नवा ट्विस्ट आला. परंतु या व्यक्तीचा दावा थोडा वेगळा होता. मी तरुणीचा पती नाही, तिने माझ्याशी विवाह केलेला नाही पण तरीही मी बाळाचा पिता आहे, असं तो म्हणाला. प्रकरण आणखी गुंतत असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. पण तरुणीचा जबाब नोंदवण्यासाठी त्यांना डॉक्टराच्याा परवानगची वाट पाहावी लागली.
तरुणीची तरुणाविरोधात बलात्काराची तक्रार
पोलिसांनी सांगितलं की, मॅरेज सर्टिफिकेट दाखवणारा पुरुषच आपला पती आणि बाळाचा पिता असल्याचं तरुणीने निसंकोचपण स्वीकारलं. एप्रिल महिन्यात आमचं लग्न झालं होतं, पण मुलगा आणि त्याच्या कुटुंबीयांनी मला सून म्हणून स्वीकारण्यास नकार दिला होता, असंही ती म्हणाली. तसंच तरुणीने तरुणाविरोधात बलात्काराची तक्रार नोंदवली आणि तो जेलमध्ये गेला होता.
यानंतर तरुणाने सांगितलं की, "आम्ही एका क्लबमध्ये भेटलो होतो आणि आमचे शारीरिक संबंध झाले. पण ती गर्भवती झाल्याचं समजताच मी तिच्याकडे थोडा वेळ मागितला. कारण कुटुंब सुरु करण्यासाठी आम्ही अजून लहान आहोत असं मला वाटलं. पण ती खचली, रागावली आणि तिने माझ्याविरोधात तक्रार दाखल केली. परंतु आता व्हॉट्सअॅपवर स्टोरी पाहून समजलं की, मी वडील आणि ती आई बनली आहे.
मुलीच्या आईने नंतर सांगितलं की, "पती-पत्नीमध्ये वाद होते. त्यामुळे माझ्या मुलीचा मित्र तिला रुग्णालयात घेऊन आला होता. पण मी तिसऱ्या व्यक्तीला ओळखत नाही." दरम्यान या सगळ्या गोंधळात तिसरा व्यक्ती मात्र रुग्णालयातून पळून गेला.
'मीच मुलीचा बाबा', रुग्णालयात तीन पुरुषांचा बाळावर दावा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
24 Jul 2019 12:24 PM (IST)
एका 21 शनिवारी वर्षीय तरुणीला प्रसुतीसाठी आणलं होतं. तरुणीसोबत तिची आई आणि एक तरुण होता. थोड्या वेळाने रुग्णालयात दुसरा पुरुष आला आणि आपण तरुणीचा पती असल्याचा दावा त्याने केला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -