नवी दिल्ली : इन्कम टॅक्स रिटर्न ज्यांनी अद्याप फाईल न केलेल्यांना सरकारने दिलासा दिला आहे. सरकारने आयटी रिटर्न फाईल करण्याची मुदत एक महिन्याने वाढवली आहे. त्यामळे आधी निर्धारित केलेली 31 जुलै ही डेडलाईन बदलून 31 ऑगस्ट करण्यात आली आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) हा निर्णय घेतला आहे. या निर्णयाने अनेकांना दिलासा मिळाला आहे. इन्कम टॅक्स विभागाने ट्विटरवर याबाबत माहिती दिली आहे.


2019-20 या आर्थिक वर्षासाठी इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करण्यासाठी 31 जुलै ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली होती. मात्र, काही करदात्यांना या मुदतीत आयटीआर फाईल करण्यात अडचणींचा सामना करावा लागत होता. यात फॉर्म-16 च्या उपलब्धतेसह अनेक  कारणांचा समावेश होता. शिवाय अनेक संस्थांनी आयटी रिटर्न भरण्याची तारीख वाढवण्याची मागणी केली होती. ही बाब लक्षात घेऊन आयटी रिटर्न फाईल करण्यासाठीची मुदत वाढवण्याचा निर्णय घेतल्याचं सीबीडीटीने नमूद केलं.

दरम्यान, आयकर विवरणपत्र दाखल करण्याच्या 31 ऑगस्ट या अंतिम तारखेनंतर दंडही द्यावा लागू शकतो. त्यामुळे अंतिम तारखेच्या आतच आयटीआर फाईल करणं फायद्याचं राहिल. यासाठी फॉर्म 16 आणि पॅन कार्डसारख्या अन्य कागदपत्रांची आवश्यकता असेल.

सर्व करदात्यांना ऑनलाईन म्हणजे प्राप्तिकर खात्याच्या वेबसाईटवरुन आयटी रिटर्न 'ई-फाईल' करणं अनिवार्य आहे. तर फक्त अति ज्येष्ठ नागरिक म्हणजे ज्यांचे वय 80 वर्षांपेक्षा जास्त आहे, असेच करदाते आयटीआर फॉर्म 1 किंवा आयटीआर फॉर्म 4 मध्ये आपला आयटी रिटर्न प्राप्तिकर खात्याच्या कार्यालयात "पेपर फॉरमॅट'मध्ये म्हणजेच "मॅन्युअल रिटर्न' सादर करु शकतात.