On This Day In History : आज जहांगीर रतनजीभाई टाटा यांची पुण्यतिथी आहे. 29 नोव्हेंबर 1993 रोजी त्यांचे निधन झाले. तेव्हा त्यांचे वय 89 वर्षे होते. भारताच्या औद्योगिक प्रगतीमध्ये जेआरडी टाटा यांचा मोठा वाटा आहे. ते भारताच्या विमान वाहतूक क्षेत्राचे संस्थापक होते. जेआरडींनी त्यांच्या समूह कंपन्यांचे काम हाती घेतले तेव्हा टाटा समूहात 14 कंपन्या होत्या, ज्या त्यांनी काही वर्षांत 90 कंपन्यांपर्यंत नेल्या. जेआरडी टाटा एक असे नाव जे केवळ एक उद्योगपती नव्हते तर त्यांनी विज्ञान, आरोग्य आणि विमानचालन या क्षेत्रात आपला ठसा उमटवला होता. वयाच्या 22 व्या वर्षी जेआरडी टाटा 1926 मध्ये वडिलांच्या निधनानंतर टाटा सन्सचे संचालक बनले आणि 12 वर्षांनी चेअरमन झाले. 25 मार्च 1991 पर्यंत ते या पदावर होते आणि या वर्षांत त्यांनी देशातील सर्वात मोठ्या औद्योगिक घराण्याला नवीन उंचीवर नेले.


1899: स्पॅनिश फुटबॉल क्लब बार्सिलोनाची स्थापना 


एफ.सी. बार्सिलोना हा स्पेन देशाच्या बार्सिलोना शहरातील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. 29 नोव्हेंबर 1899 साली स्थापन झालेला बार्सिलोना जगातील सर्वोत्तम व सर्वात लोकप्रिय फुटबॉल क्लबांपैकी एक मानला जातो. स्पेनच्या ला लीगा या सर्वोत्तम श्रेणीच्या लीगमध्ये खेळणाऱ्या बार्सिलोनाने आजवर देशामधील व युरोपातील सर्व प्रमुख स्पर्धा जिंकल्या आहेत. 320 कोटी अमेरिकन डॉलर इतके मूल्य असलेला बार्सिलोना जगातील दुसऱ्या क्रमांकाचा श्रीमंत फुटबॉल क्लब आहे.


1907: प्रसिद्ध लेखक गोपीनाथ तळवलकर यांचा जन्म


बालसाहित्यिक गोपीनाथ तळवलकर यांचा जन्म 29 नोव्हेंबर 1907 रोजी झाला. बालसाहित्यिक, चरित्रकार, कवी व आनंद मासिकाचे संपादकपद 35 वर्षे सांभाळणारे गोपीनाथ तळवलकर यांनी प्रौढसाक्षरांसाठीही लिखाण केले. कणिका, खंडकाव्य, बालकविता असे विविध काव्यप्रहार हाताळूनही त्यांचे नाव झाले नाही. आकाशमंदिर, छायाप्रकाश, नंदिता या कादंबर्‍या, ज्ञानेश्वरीतील सौंदर्यविश्व हे रसग्रहण, तसेच मुलांसाठीची अनेक पुस्तके त्यांनी लिहिली होती.


1939 : डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन यांची पुण्यतिथी


माधव जूलियन  मराठी भाषेतील कवी, रविकिरण मंडळाचे संस्थापक सदस्य होते. माधव जूलियन  हे फारसी आणि इंग्रजीचे प्राध्यापक होते. इंग्लिश कवी शेले याने रचलेल्या ज्यूलियन आणि मडालो या कवितेवरून यांनी जूलियन असे टोपणनाव धारण केले.याशिवाय ’गॉड्ज गुड मेन’ या कादंबरीतील नायिका ’ज्युलियन’ या व्यक्तिरेखेवरून माधवरावांनी ज्युलियन हे नाव घेतले असेही सांगितले जाते. माधव त्र्यंबक पटवर्धनांना त्यांच्या छंदोरचना या ग्रंथासाठी मुंबई विद्यापीठाने 1 डिसेंबर 1938 रोजी डी.लिट्. ही सन्माननीय पदवी दिली. मुंबई विद्यापीठाने मराठी साहित्यासाठी दिलेली ही पहिली डी.लिट. होती. माधव ज्युलियन यांचे निधन 29 नोव्हेंबर 1939 रोजी झाले. 


29 नोव्हेंबर 2008 या दिवशी ताज हॉटेल दहशतवाद्यांपासून मुक्त करण्यात आले


2008 मध्ये 26 नोव्हेंबर रोजी मुंबईत ताज हॉटेल, ओबेरॉय ट्रायडेंट, नरिमन हाऊस, सीएसएमटी रेल्वे स्टेशन, कामा हॉस्पिटल, लिओपोल्ड कॅफे अशा एकूण 12 ठिकाणी पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या दहशतवादी हल्ल्यात 166 जणांना जीव गमवावा लागला, तर 300 हून अधिक लोक जखमी झाले. पाकिस्तानातील कराची येथून समुद्रमार्गे मुंबईत दाखल झालेल्या लष्कर-ए-तोयबाच्या 10 दहशतवाद्यांनी शहरात 4 दिवस गोंधळ घातला. मुंबई पोलीस, भारतीय लष्कर, मरीन कमांडो आणि एनएसजी यांनी प्रदीर्घ चकमकीनंतर यातील 9 दहशतवाद्यांना ठार केले. हे दहशतवादविरोधी ऑपरेशन 26 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबरपर्यंत चालले. 29 नोव्हेंबर 2008 या दिवशी ताज हॉटेल दहशतवाद्यांपासून मुक्त करण्यात आले.