The Kashmir Files in IFFI : 53 वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव गोव्यात (IFFI Goa) मोठ्या उत्साहात पार पडला. या महोत्सवात अनेक चांगल्या सिनेमांचं प्रदर्शन झालं शिवाय चांगल्या चर्चाही घडून आल्या. शेवटच्या समारोपाच्या कार्यक्रमात मात्र एक अशी घटना घडली की ज्यामुळं आता एका नव्या वादाला तोंड फुटलं आहे. इफ्फी सोहळ्याच्या सांगता समारंभात स्पर्धेचे ज्युरी चेअरमन नदाव लॅपिड यांनी द काश्मीर फाईल्स या सिनेमाचा या फेस्टिव्हलमध्ये समावेश होणं ही धक्कादायक बाब असल्याचं म्हटलं. द काश्मीर फाईल्स ही प्रोपगेंडा फिल्म आहे. अशा सिनेमाची इतक्या प्रतिष्ठेच्या फिल्म फेस्टिवलमध्ये केली गेलेली निवड आम्हा सर्वांसाठीच खटकणारी होती असंही ते म्हणाले.
इफ्फीच्या ज्युरीचे अध्यक्ष इस्रायली दिग्दर्शक नदाव लॅपिड म्हणाले की, 'द कश्मीर फाइल्स' या चित्रपटाने आम्हा सर्वांना व्यथित केले आणि आम्हाला प्रचंड धक्का बसला. अशा प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवाच्या कलात्मक आणि स्पर्धात्मक विभागासाठी हा चित्रपट अतिशय अयोग्य वाटला. माझ्या या चित्रपटाविषयी असणाऱ्या भावना मी उघडपणे मांडतोय कारण इतक्या प्रतिष्ठित महोत्सवात अश्या प्रकारच्या कठोर टीका या व्हायलाच हव्यात..!' असंही ते म्हणाले.
चित्रपट महोत्सवात सहभागी होण्यासाठी दिग्गज अभिनेते, दिग्दर्शक गोव्यात पोहोचले होते. दरम्यान, इस्रायली चित्रपट निर्माते नदाव लॅपिड यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये नदाव लॅपिड यांनी 'द काश्मीर फाइल्स' चित्रपटावर आणि या चित्रपटाच्या इफ्फीमधील सहभागावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
विशेष म्हणजे या कार्यक्रमाला गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांच्यासह चित्रपटातील कलाकार उपस्थित होते. विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित द काश्मिर फाईल्स या चित्रपटात अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती आणि पल्लवी जोशी मुख्य भूमिकेत दिसले होते. हा चित्रपट काश्मिरी पंडितांच्या विषयांवर आधारित आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने भरघोस कमाई केली होती. दरम्यान नदाव यांच्या या मतानंतर आता यावर सोशल मीडियावर जोरदार चर्चा होता दिसत आहे.
खासदार प्रियांका चतुर्वेदींनी केलं ट्वीट
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी देखील ट्वीट केलं आहे.