Odisha Train Accident: माजी रॉ प्रमुख, एनआयएचे माजी संचालक, आयबीचे निवृत्त अधिकारी आणि काही राज्यांचे निवृत्त डीजीपी यांच्यासह देशातील 270 माजी न्यायाधीश, निवृत्त आयएएस-आयपीएस आणि लष्करी अधिकाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ओडिशातील बालासोर रेल्वे अपघाताबाबत (Odisha Train Accident) पत्र लिहिलं आहे. या पत्रातून दुर्घटनेमागे मोठं दहशतवादी कारस्थान असल्याची भीती व्यक्त केली आहे. तसेच, देशभरात पसरलेल्या रेल्वे ट्रॅकच्या सुरक्षेसाठी सरकारनं अवैध घुसखोर आणि रेल्वे रुळांवर स्थायिक झालेलं अवैध अतिक्रमण हटवण्याची मागणीही या पत्रातून करण्यात आली आहे.
देशातील 14 माजी न्यायाधीश, 115 रिटायर्ड ब्यूरोक्रेट (11 माजी राजनीतिज्ज्ञ) आणि 141 माजी लष्करी अधिकार्यांसह एकूण 270 प्रतिष्ठित व्यक्तींनी 1990 च्या उत्तरार्धात आणि 2000 च्या दशकाच्या सुरुवातीला ईशान्येकडील राज्य आणि जम्मू-काश्मीर आणि पठाणकोट येथे झालेल्या दहशतवादी हल्यांसोबत ओडिशा दुर्घटनेचाही उल्लेख करत सखोल तपास करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, बालासोर दुर्घटनेचा तपास अद्याप सुरू आहे. परंतु, प्राथमिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, कदाचित ही दुर्घटना दहशतवादी हल्ल्याचा कट असू शकतो, असा संशय व्यक्त केला जात आहे.
सीबीआयच्या तपासाचा निर्णय योग्य ठरवत सीबीआय खऱ्या गुन्हेगारांचा पर्दाफाश करेल, अशी अपेक्षा असल्याचंही या पत्रात नमूद करण्यात आलं आहे. संपूर्ण देशात पसरलेल्या रेल्वे नेटवर्कला धोका असल्याचा उल्लेखही या पत्रातून करण्यात आला आहे. तसेच, या पत्रात असं लिहिलं आहे की, भारताचे संपूर्ण रेल्वे नेटवर्क असुरक्षित आहे आणि विशेषत: 'चिकन नेक' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पूर्व आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये याचा सर्वाधिक धोका आहे.
दरम्यान, या पत्रात पंतप्रधानांनी कठोर पावलं उचलावीत, अशी मागणीही करण्यात आली आहे. तसेच, रेल्वे रुळांसह अवैध अतिक्रमण हटवून आमच्या रेल्वे ट्रॅकच्या सुरक्षेसाठी कठोर पावलं उचलणं अत्यावश्यक आहे, असं पत्रात म्हटलं आहे.
ओडिशा दुर्घटना नेमकी काय?
कोरोमंडल एक्सप्रेस 2 जून रोजी संध्याकाळी 7 वाजेच्या सुमारास एका थांबलेल्या मालगाडीवर धडकली. अपघातात त्याचे बहुतांश डबे रुळावरून घसरले. त्यानंतर त्याचवेळी जाणाऱ्या बेंगळुरू-हावडा एक्स्प्रेसच्या डब्यांशी त्याचे काही डबे आदळले. ओडिशातील बालासोर येथे तीन ट्रेनची धडक होऊन भीषण अपघात झाला. ओडिशाचे मुख्य सचिव प्रदीप जेना यांनी दिलेल्या माहितीनुसार, बालासोर रेल्वे अपघातातील मृतांची संख्या 288 वर पोहोचली आहे. यापैकी 193 मृतदेह भुवनेश्वर येथील एम्समध्ये तर 94 मृतदेह बालासोर येथील विविध रुग्णालयांमध्ये ठेवण्यात आले होते. पूर्व मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक रिंकेश रॉय यांनी सांगितले की, ओडिशाच्या विविध रुग्णालयांमध्ये 200 हून अधिक लोक उपचार सुरु असून इतर जखमींना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
मानवी चुकीमुळे घडला अपघात?
या रेल्वे अपघाताचं खरं कारण समोर आलं आहे. इलेक्ट्रॉनिक इंटर लॉकींग सिस्टीममुळे (Electronic Inter Locking System) घडल्याचं समोर आलं आहे. या सिग्नल यंत्रणेत काही बदल केल्यामुळे हा अपघात झाल्याचं कळतंय. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) यांनी ही माहिती दिली. रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी हे कारण शोधून काढल्याचं त्यांनी सांगितलं. सध्या रेल्वे सेवा पूर्ववत करण्यावर भर असल्याचंही रेल्वेमंत्री म्हणाले.
महत्त्वाच्या इतर बातम्या :