Odisha Train Accident: ओडिशा दुर्घटनेला (Odisha Train Accident) 10 दिवस झाले आहेत. परंतु, अद्याप या दुर्घटनेसंदर्भातील प्रश्न, आरोप-प्रत्यारोप अद्याप कमी झालेले नाहीत. ओडिशा दुर्घटनेवरुन काँग्रेस सातत्यानं मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहे. काँग्रेसनं काही दिवसांपूर्वी मोदी सरकारवर एक मोठा आरोप केला होता. केंद्र सरकारनं रेल्वे सुरक्षा निधी फूट मसाजर, क्रॉकरी आणि फर्निचरवर खर्च करण्याचा आरोप काँग्रेसच्या वतीनं करण्यात आले होते. तसेच, कॅगच्या अहवालातून ही बाब सिद्ध झाल्याचंही बोललं जात होतं. याचप्रकरणी आता रेल्वेनं हे सर्व आरोप फेटाळले आहेत. तसेच, ज्यासाठी रेल्वे सुरक्षा निधी खर्च करण्यात आला होता, तो आनावश्यक खर्च नव्हता, तर रेल्वेच्या सुरक्षेचाच एक आवश्यक भाग होता, असं रेल्वेच्या वतीनं सांगण्यात आलं आहे. 


पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, रेल्वेनं फूट मसाजर, क्रॉकरी, एसी आणि इतर वस्तू लक्झरी अनावश्यक खर्च नसल्याचं म्हटलं आहे. हे लोको पायलट, ट्रेनमधील गार्ड यांच्यासाठी तयार करण्यात आलेल्या रनिंग रुम्स म्हणजेच, गेस्ट हाऊससाठी खरेदी करण्यात आलं होतं. 9 ते 10 तासांच्या ड्युटीनंतर, लोको पायलट सक्तीच्या विश्रांतीसाठी या रनिंग रूममध्ये जातात. हे रेल्वेच्या सुरक्षा समितीच्या शिफारशीनुसार आहे आणि दावा केल्यानुसार फालतू खर्च नाही, असं रेल्वेनं आपल्या स्पष्टीकरणात म्हटलं आहे.


काँग्रेसचा गंभीर आरोप 


काँग्रेसनं शुक्रवारी (9 जून) नियंत्रक आणि महालेखा परीक्षक (CAG) च्या 2021 च्या अहवालाचा हवाला देऊन दावा केला की, केंद्र सरकारनं क्रॉकरी, फूट मसाजर, फर्निचर, लॅपटॉप यांसारख्या वस्तू विकत घेण्यासाठी रेल्वे सुरक्षेसाठी दिलेल्या निधीचा 'दुरुपयोग' केला आहे. ओडिशाच्या बालासोर येथे झालेल्या तीन रेल्वे अपघातात 278 लोक ठार आणि सुमारे 1,000 जखमी झाल्याच्या काही दिवसांनंतर काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी ट्विटरवर म्हटलं आहे की, "विशेषतः रेल्वे सुरक्षेसाठीचा पैसा अशा प्रकारे वळवण्यात आला. कॅगनं हेच सांगितलं आहे."


कॅगच्या अहवालातून रेल्वे सुरक्षा निधीबाबत खळबळजनक खुलासा


रेल्वे सुरक्षा सुधारण्यासाठी 2017 मध्ये नरेंद्र मोदी सरकारद्वारे मंजूर करण्यात आलेल्या राष्ट्रीय रेल्वे सुरक्षा निधी (RRSK) या विशेष निधीचा दुरुपयोग केल्याचा आरोप कॅगच्या अहवालात (CAG Report) करण्यात आला आहे. मोदी सरकारकडून (Modi Government) राष्ट्रीय रेल्वे सुरक्षा निधी (RRSK) या विशेष निधीतून फूट मसाजर, क्रॉकरी, इलेक्ट्रिकल उपकरणं, फर्निचर, हिवाळ्यातील जॅकेट, कॉम्प्युटर आणि एस्केलेटर खरेदी करण्यासाठी, उद्यानं विकसित करणं, शौचालयं बांधणं, वेतन आणि बोनस देण्यासाठी करण्यात आला. दरम्यान, द टेलिग्राफमध्ये हे वृत्त प्रकाशित करण्यात आलं होतं. द टेलिग्राफच्या मते, डिसेंबर 2022 मध्ये नियंत्रक आणि महालेखा परीक्षक (CAG) नं सादर केलेल्या भारतीय रेल्वेमधील ट्रेन रुळावरून घसरल्याबद्दलच्या लेखापरीक्षण अहवालातही असाच काहीसे तपशील आहेत.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


रेल्वे सुरक्षेसाठीचा केंद्राचा विशेष निधी फूट मसाजर, क्रॉकरी अन् फर्निचरसाठी खर्च; कॅगच्या अहवालात खळबळजनक खुलासा