नवी दिल्ली : भारतीय सैन्याच्या अनेक गौरवगाथा आपल्याला माहित आहेत. यातीलच एक म्हणजे 1971 मधील भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील युद्ध. या युद्धाचा मुख्य केंद्रबिंदू असलेल्या लोंगेवाला येथे शनिवारी अर्थात 15 जानेवारी रोजी सैन्य दिनानिमित्त भारताचा राष्ट्रीय ध्वज फडकवला जाणार आहे. खादी कापडापासून बनवलेला जगातील सर्वात मोठा तिरंगा यावेळी भारत-पाकिस्तान सीमेवर भव्य सार्वजनिक प्रदर्शनात फडकवला जाणार आहे.
या भव्य ध्वजाचे मागील वर्षी म्हणजेच 2 ऑक्टोबर 2021 रोजी लेहमध्ये अनावरण करण्यात आलं होतं. आतापर्यंत हा राष्ट्रीय ध्वज पाच सार्वजनिक प्रदर्शनात फडकावण्यात आला आहे. यामध्ये 8 ऑक्टोबर 2021 रोजी हवाई दल दिनानिमित्त हिंडन हवाई तळावर आणि 21 ऑक्टोबर रोजी भारतात 100 कोटी कोविड लसीकरण पूर्ण झाल्यानिमित्त लाल किल्ल्यावर हा ध्वज फडकवण्यात आला होता. 4 डिसेंबर 2021 रोजी, नौदल दिन साजरा करण्यासाठी मुंबईतील गेटवे ऑफ इंडियाजवळील नौदल गोदी येथे देखील हा राष्ट्रीय ध्वज फडकवण्यात आला होता.
असा आहे ध्वज
हा राष्ट्रीय ध्वज 225 फूट लांब, 150 फूट रुंद असून वजन (अंदाजे) 1400 किलोग्रॅम आहे. हा ध्वज तयार करण्यासाठी 70 खादी कारागिरांना 49 दिवस लागले. या राष्ट्रीय ध्वजाच्या निर्मितीमुळे खादी कारागीर आणि संबंधित कामगारांसाठी सुमारे 3500 मनुष्य तास अतिरिक्त रोजगाराची निर्मिती झाली . एकूण 33, 750 चौरस फूट क्षेत्रफळ असलेला ध्वज तयार करण्यासाठी हाताने कातलेल्या, हाताने विणलेल्या तब्बल 4500 मीटर खादी कापडाचा वापर करण्यात आला आहे. ध्वजातील अशोक चक्र 30 फूट व्यासाचे आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
- Delhi Security : 26 जानेवारीला दिल्लीत मोठ्या घातपाताचा कट? गाझीपूर फूल मार्केटमधून IED आणि RDX जप्त
- UP Assembly Election 2022 : उत्तर प्रदेशात आजपासून पहिल्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू; 'या' जागांवर चुरस
- CDS Bipin Rawat Chopper Crash : सीडीएस बिपिन रावत यांच्या हेलिकॉप्टर क्रॅशचं कारण आले समोर, एअरफोर्सच्या चौकशी समितीने दिली माहिती
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha