UP Assembly Election 2022 : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यासाठी अधिसूचना आजपासून जारी होणार आहे. त्यासोबतच उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रियाही आजपासूनच सुरू होणार आहे. या टप्प्यात उत्तर प्रदेशातील 11 जिल्हे शामली, मेरठ, मुजफ्फरनगर, बागपत, हापुड, गौतमबुद्धनगर, गाजियाबाद, बुलंदशहर, मथुरा, आग्रा आणि अलीगढ या एकूण 58 जागांसाठी मतदान होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारिख 21 जानेवारी असणार आहे.
24 जानेवारीला उमेदवारी अर्जांची छाननी होणार असून 27 जानेवारीपर्यंत नावे मागे घेता येणार आहेत. तसेच पहिल्या टप्प्यातील मतदान 10 फेब्रुवारी रोजी होणार आहे. तर निवडणुकीचा निकाल 10 मार्च रोजी लागणार आहे.
पहिल्या टप्प्यात पश्चिम उत्तर प्रदेशात विविध पक्षांच्या उमेदवारांमध्ये चुरशीची लढत होणार आहे. यापैकी कैराना, मुझफ्फरनगर, सरधना, मेरठ आणि नोएडा या जागांवर विशेष लक्ष असणार आहे.
2017 च्या विधानसभा निवडणुकीत पहिल्या टप्प्यात समाविष्ट झालेल्या बहुतांश जागा भाजपच्या वाट्याला आल्या होत्या. 2017 च्या निवडणुकीत भाजपने यापैकी 53 जागा जिंकल्या होत्या. या 58 जागांवर गेल्या वेळी समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाने प्रत्येकी दोन जागा जिंकल्या होत्या, तर राष्ट्रीय लोकदलाने एक जागा जिंकली होती. उत्तर प्रदेश विधानसभेच्या 403 जागांसाठी 10, 14, 20, 23, 27 फेब्रुवारी आणि 3 आणि 7 मार्च रोजी सात टप्प्यांत मतदान होणार आहे.
योगींना धक्क्यांवर धक्के! तीन दिवसांत 3 मंत्री, 8 आमदारांचे राजीनामे
उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. पण उत्तर प्रदेशकडे सर्व देशाचं लक्ष लागले आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना मोठा धक्का बसला आहे. मागील तीन दिवसांत उत्तर प्रदेशमधील भाजपच्या नेत्यांनी पक्षांतर केलं आहे. तीन दिवसांत तीन मंत्री आणि आठ आमदारांनी भाजपला रामराम केला आहे. त्यामुळे निवडणूकीपूर्वी योगी आदित्यनाथ यांना धक्क्यावर धक्के बसत आहेत. भाजपसाठी ही चिंतेची गोष्ट मानली जात आहे.
विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. प्रचारालाही सुरुवात झाली आहे. असे असतानाच भाजपला आतापर्यंत 14 नेत्यांनी रामराम केलाय. गुरुवारी सत्ताधारी भाजपमधील मंत्री धर्म सिंह सैनी यांनी राजीनामा दिलाय. धर्म सिंह सैनी यांनी समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्याशी बातचीत केली आहे. ते समाजवादी पार्टीमध्ये प्रवेश करु शकतात, असा अंदाज वर्तवला जात आहे. याआधी बुधवारी दारा सिंह चौहान आणि मंगळवारी स्वामी प्रसाद मौर्य यांनी मंत्रिमंडळातून राजीनामा दिला होता, त्यानंतर त्यांनीही अखिलेश यादव यांच्याशी बातचीत केली होती. याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आले होते.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- UP Election 2022: योगी आदित्यनाथ यांनी आयोध्येतून निवडणूक लढवल्यास भाजपला फायदा होणार? पाहा सर्व्हे काय म्हणतोय
- UP Assembly Elections 2022: योगी सरकारमधील मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांनी नेमका का दिला राजीनामा?
- Sharad Pawar : पाचपैकी तीन राज्यात राष्ट्रवादी निवडणूक लढवणार, गोव्यात महाविकास आघाडीसाठी प्रयत्न; शरद पवारांची घोषणा
- योगी आदित्यनाथांचं ठरलं, या वेळी 'जय श्रीराम'! मथुरा नाही आयोध्येतून निवडणूक लढवणार
- UP Election 2022 : अयोध्येत योगींच्या विरोधात शिवसेनेचा उमेदवार, मथुरेतून प्रचाराचा नारळ फुटणार : संजय राऊत
मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live