Sukesh Chandran : तिहार तुरुंगात असलेला सुमारे 200 कोटींच्या घोटाळा प्रकरणातील आरोपी सुकेश चंद्रशेखर याची प्रकृती खालावली आहे. सध्या त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मागील 49 दिवसांपासून तो उपोषण करत असल्याने त्याची प्रकृती खालावली असल्याचे म्हटले जात आहे. 


वृत्तसंस्थांनी दिलेल्या वृत्तानुसार, सुकेशने तिहार कारावासातील महिला तुरुंगात असलेली पत्नी मारिया पॉलला आठवड्यातून भेटण्यास परवानगी मिळावी अशी मागणी तुरुंग प्रशासनाकडे केली  आहे. या मागणीसाठी तो 23 एप्रिलपासून उपोषणावर आहे. उपोषणामुळे त्याने फारच कमी दिवस अन्नपदार्थांचे सेवन केले आहे. उपोषणाची सुकेशमुळे प्रकृती बिघडू नये यासाठी त्याला दुसऱ्या बराकीत दाखल करण्यात आले होते. मात्र, तिथे दाखल करताच त्याची प्रकृती खालावली. डॉक्टरांनी सारका तगादा लावल्याने त्याने एक-दोन दिवस अन्नपदार्थ घेतले असल्याचे वृत्त आहे.


तिहार कारावासाचे डीजी संदीप गोयल यांनीदेखील सुकेशच्या उपोषणाच्या वृत्ताला दुजोरा दिला. सुकेशमध्ये 23 एप्रिलपासून उपोषणावर असला तरी मधल्या काळात त्याने स्वत: हून उपोषण तोडले आहे. तुरुंगातील नियमाप्रमाणे त्याला त्याच्या पत्शीसोबत महिन्यातून दोन वेळेस भेटण्याची मुभा दिली जाते. हाच नियम इतर कैद्यांसाठीदेखील आहे. सुकेशने दर आठवड्याला आपल्या पत्नीला भेटू देण्याची मागणी केली आहे. मात्र, ही मागणी पूर्ण करता येणार नसल्याचे तुरुंग अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. 


सुकेश चंद्रशेखर आहे तरी कोण?


सुकेश चंद्रशेखर हा बंगळुरुतला एक  व्यावसायिक आहे. सुरुवातीला नोकरी देण्याच्या आमिषाने त्याने अनेकांची फसवणूक केली.  75 जणांचे 100 कोटी रुपये घेऊन त्याने पोबारा केला होता. वयाच्या 17 व्या वर्षी त्याला पहिल्यांदा अटक झाली होती.सुकेशने राजकारण्यांच्या नावाने सव्वा कोटी रुपये त्याने उकळले होते.कधी करुणानिधी, कधी कुमारस्वामी, कधी जयललितांच्या नावाचा वापर केला. 2017 मध्ये तामिळनाडूच्या राजकारणात त्याने डील करण्याचा प्रयत्न केला होता. निवडणूक आयोगात ओळख असल्याचं सांगून हवं ते चिन्ह मिळवून देण्याचं आमिष त्यानं दाखवले. याच प्रकरणात दिल्ली पोलिसांनी त्याला 2017 मध्ये अटक केली. त्याच्या हॉटेल रुममध्ये सव्वा कोटी रुपये जप्त केले. अटक झाल्यानंतरही 
सुकेशने दिल्लीतल्या तुरुंगातूनच खंडणी वसुली सुरु केली होती.  सुकेशवर 200 कोटींच्या मनी लाँड्रिंगचा आरोप आहे. 2013 मध्ये चेन्नईच्या कॅनरा बँकेलाही त्याने चुना लावला. 


अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसला त्याने एकूण 5 जनावरं भेट म्हणून दिली. त्यातल्या अरबी घोड्याची किंमत तब्बल 52 लाख आणि प्रत्येकी 9 लाख रुपये किंमत असलेली एकूण 36 लाखांच्या 4 पर्शियन मांजरांचाही समावेश असल्याचे ईडीने त्याच्याविरुद्ध आरोपपत्रात म्हटले आहे. फक्त जॅकलीनच नाही तर नॅशनल क्रश नोरा फतेही देखिल सुकेशच्या उधळपट्टीची लाभार्थी होती अशीही माहिती समोर आली आहे.  आरोपपत्रातल्या आरोपानुसार सुकेश चंद्रशेखरने नोरा फतेहीला एक बीएमडब्ल्यू कार आणि एक आयफोनही गिफ्ट केला होता.. ज्याची एकूण किंमत ही 1 कोटींच्या आसपास होती.