Govt Bans Surrogate Ads : काही दिवसांत चेहरा उजळ करण्याचा दावा असणारा क्रीम असो किंवा वेलचीच्या नावााखाली गुटखा विक्री करणारी जाहिरात तुम्ही सर्वांनीच पाहिली असेल. ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवर आता लगाम लागण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने अशा दिशाभूल करणाऱ्या जाहिराती रोखण्यासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. जाहिरातींबाबत केंद्र सरकारने नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यामध्ये लहान मुलांसाठी असलेल्या जाहिरातींचाही समावेश आहे.
जाहिराती प्रसिद्ध अथवा प्रसारीत करण्यापूर्वी योग्य ती सावधगिरी बाळगण्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे. ग्राहक संरक्षण खात्याने आता 'सरोगेट' जाहिरातींवरदेखील चाप लावला आहे. जाहिरातींमध्ये अधिक पारदर्शकता आणण्याचे निर्देश केंद्र सरकारने दिले आहे. जाहिरातींबाबत केंद्र सरकारने नवीन मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. या सूचनांची तातडीने अंमलबजावणी करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.
ग्राहक संरक्षण विभागाचे सचिव रोहित कुमार सिंह यांनी सांगितले की, जाहिरातींकडे ग्राहक अधिक आकर्षित होतात. त्यामुळे सरकारने निष्पक्ष जाहिरातींसाठी काही मार्गदर्शक सूचना लागू केल्या आहेत. या नव्या नियमांचे पालन न झाल्यास ग्राहक संरक्षण कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे. हे नियम प्रिंट, टीव्ही आणि डिजीटल प्लॅटफॉर्मसाठी लागू होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सरोगेट जाहिरात म्हणजे काय?
सरोगेट जाहिरात या दिशाभूल करणाऱ्या जाहिराती असतात. यामध्ये एका उत्पादनाची प्रतिमा दाखवून इतर उत्पादनाची जाहिरात केली जाते. उदाहरणार्थ सोडा वॉटरच्या जाहिराती आडून मद्याची जाहिरात केली जाते. त्याशिवाय, वेलचीच्या आडून गुटखा उत्पादनाची जाहिरात केली जाते. अशा जाहिरातींना सरोगेट जाहिरात म्हणतात.
सेलिब्रेटीही कारवाईच्या जाळ्यात?
शुक्रवारी जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार, उत्पादन अथवा सेवांची जाहिरात करणारे चित्रपट अथवा अन्य क्षेत्रातील सेलिब्रेंटीदेखील जबाबदार असल्याचे समजले जाणार आहे. दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींमध्ये सहभागी झाल्याबद्दल त्यांच्यावर कारवाई होऊ शकते.
जाहिरातींमधील डिस्क्लेमरदेखील त्याच भाषेत आणि मुख्य जाहिरातीत असलेल्या शब्दांच्या आकारांप्रमाणे असावा असेही निर्देश देण्यात आले आहेत.