मुंबई : मध्य रेल्वेवरील दादर ते माटुंगा स्थानकांच्या दरम्यान अॅप्रेंटिसनी रेलरोको केला. त्यामुळे मुंबईतील रेल्वेसेवा विस्कळीत झाली. पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केला, तर प्रत्युत्तरादाखल आंदोलकांनी दगडफेक केली. एकंदरीत आंदोलन चिघळले.
अप्रेंटिसच्या आंदोलनात नियोजनबद्धता दिसून आली नाही. कदाचित आंदोलन उस्फूर्त असल्याने तसे झाले असावे. त्यात ऐन गर्दीच्या वेळी मुंबईकरांना त्रास सहन करावा लागल्याने आंदोलनाला सहानुभूतीही मिळाली नाही.
आंदोलनाची हाक देताना, ते थांबवायचं कधी याचं भान आवश्यक असते. यानिमित्ताने जॉर्ज फर्नांडीस यांनी पुकारलेल्या अखिल भारतीय रेल्वे बंदची आठवण होते. 20 दिवस जॉर्ज फर्नांडीस यांनी संपूर्ण रेल्वे बंद केली होती. मात्र एकही मागणी मान्य न होताही त्यांनी हा बंद मागे घेतला होता. मात्र हा देशातील सर्वात मोठा रेल्वे संप होता. वेतनवाढ, किमान बोनस, कामाचे तास यांसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला होता. तब्बल 20 दिवस चाललेल्या या संपाने संपूर्ण देश ठप्प झाला होता.
सोशालिस्ट पार्टीचे नेते असलेले जॉर्ज फर्नांडीस यांच्या नेतृत्त्वाते हा संप पुकारण्यात आला होता. जॉर्ज हे त्यावेळी इंडियन रेल्वेमेन्स फ़ेडरेशनचे अध्यक्षही होते. एआयआरएफ, एआयएसआरएसए, एआयआरयसी, एआयटीयूसी, बीआयटीयू, बीआरएमएस यांसह एकूण 125 रेल्वे ट्रेड यूनियन या संपात सहभागी झाल्या होत्या. सुमारे 17 लाखांहून अधिक रेल्वे कर्मचारी सहभागी झाले होते.
7 मे 1974 रोजी सुरु झालेल्या हा संप 27 मे 1974 पर्यंत सुरु राहिला. खरंतर 8 मे ही संपाची नियोजित तारीख असली, तरी संप खऱ्या अर्थाने 7 मे रोजीच सुरु झाला होता. कारण राष्ट्रीय मजदूर यूनियनचे पदाधिकारी मलगी यांचा मुंबईत पोलिस कोठडीत अचानक मृत्यू झाला आणि इतर पदाधिकारी आक्रमक झाले. त्यामुळे 8 मे रोजीचा संप 7 तारखेलाच सुरु झाला. त्यामुळे 7 मे ते 27 मे अशा 20 दिवस हा संप चालला.
तत्कालीन इंदिरा गांधी सरकारने हा संप दडपण्याचा पूर्ण प्रयत्न केला. आणीबाणीचे संकेतही याच संपादरम्यान दिसल्याचे आजही अनेकजण सांगतात. संपात सहभागी सुमारे एक लाख रेल्वे कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढण्यात आले होते, तर सुमारे 30 हजार कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले होते. या संपादरम्यान जॉर्ज फर्नांडीस यांना लखनऊमधून अटक करण्यात आली होती. जॉर्जना अटक केल्यानंतर तर संपातली आक्रमकता आणखी वाढली होती.
1974 चा रेल्वे संप हा जगातील सर्वात मोठा रेल्वेचा संप मानला जातो. या संपातील सर्वच मागण्या मान्य झाल्या अशातला भाग नाही. किंबहुना, संपानंतर काही महिन्यातच देशात आणीबाणी लागू झाली. त्यामुळे मागण्या मान्य होण्याचा प्रश्नच नव्हता. मात्र 1979 साली तत्कालीन पंतप्रधान चरण सिंह यांनी किमान बोनस देण्याचे मान्य केले आणि किमान 8.33 टक्के बोनस देण्यासही सुरुवात केली.
या संपाचा कर्मचाऱ्यांचा सर्वाधिक फटका बसला. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, अनेकांना तुरुंगवास भोगावा लागला, अनेकांना लाठीमार, गोळ्या झेलाव्या लागल्या. मात्र कर्मचारी सलग 20 दिवस लढत राहिले. आणीबाणीनंतर इंदिरा गांधी सरकार सत्तेतून खाली आल्यानंतर 1977 साली जनता पक्षाचं सरकार सत्तेत आले आणि त्यानंतर अस्थिर कर्मचाऱ्यांना कायम करण्याची प्रक्रिया सुरु झाली, सुमारे 3 वर्षे नोकरीवरुन काढून टाकलेल्या कर्मचाऱ्याने पुन्हा कामावर घेण्यात आले.
भारतात आतापर्यंत अनेक मोठ-मोठी आंदोलने झाली, संप झाले, मोर्चे निघाले, मात्र हे सारे नियोजनशून्य असेल, मागण्यांसाठी ठोस कृती-कार्यक्रम नसेल, तर आंदोलनातील हवा निघून जाते. 1974 चा संप नियोजनबद्ध होता. मात्र इंदिरा गांधी सरकारला तो संप दडपून टाकण्यात यश मिळाले. मात्र या संपातील नियोजनाचे कौतुक आजही केले जाते. कुठेही संप फुटला नाही किंवा कुठेही नेतृत्वाच्या निर्णयाआधी संप मागे घेतला गेला नव्हता.
20 दिवस, 17 लाख कर्मचारी, 1974 चा ऐतिहासिक रेल्वे संप
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
20 Mar 2018 11:17 AM (IST)
राष्ट्रीय मजदूर यूनियनचे पदाधिकारी मलगी यांचा मुंबईत पोलिस कोठडीत अचानक मृत्यू झाला आणि 8 मे रोजीचा नियोजित संप 7 मे रोजीच सुरु झाला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -