Today Dinvishesh: आज म्हणजे 19 नोव्हेंबर रोजी देखील भारतात आणि जगात खूप महत्वाच्या घटना घडल्या होत्या. आज इंदिरा गांधी, झाशीची राणी लक्ष्मीबाईंची जयंती. जाणून घ्या आज घडलेल्या महत्वाच्या घडामोडी
आज आंतरराष्ट्रीय पुरुष दिन (International Mens Day 2022)
'आंतरराष्ट्रीय पुरुष दिन' (International Mens Day 2022) दरवर्षी 19 नोव्हेंबर रोजी समाज आणि कुटुंबातील पुरुषांचे महत्त्व आणि योगदान साजरा करण्यासाठी साजरा केला जातो. हाच दिवस आहे जेव्हा समाजात पुरुषांच्या कल्याणासाठी आणि आरोग्याबाबत जागरुकता आणली जाते. आंतरराष्ट्रीय पुरुष दिन हा सहा स्तंभांवर आधारित आहे, जे समाजातील पुरुषांची सकारात्मक प्रतिमा प्रतिबिंबित करतात. हा दिवस समाज, समुदाय, कुटुंब, विवाह, मुलांची काळजी आणि पर्यावरणात पुरुषांचे योगदान साजरे करण्यावर भर देतो. या दिवशी समाजात पुरुषांविरुद्ध होत असलेल्या भेदभावावरही प्रकाश टाकला जातो. पुरुष दिन देखील लैंगिक समानतेला प्रोत्साहन देतो.
1828 : झाशीची राणी 'राणी लक्ष्मीबाई' यांचा जन्म (Rani Lakshmibai)
'मैं मेरी झांशी नहीं दूंगी' म्हणत ब्रिटिशांविरोधात आव्हान देणाऱ्या राणी लक्ष्मीबाई म्हणजेच झाशीची राणी यांचा जन्म आजच्या दिवशी 1828 साली झाला होता. 1857 च्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीविरुद्ध झालेल्या स्वातंत्र्य उठावातील या एक अग्रणी सेनानी होत्या. महाराणी लक्ष्मीबाईंचे मूळ नाव मणिकर्णिका होते. इंग्रजांशी लढत असताना राणी लक्ष्मीबाई रक्तबंबाळ होऊन घोड्यावरून खाली कोसळल्या. घायाळ झालेल्या राणी लक्ष्मीबाई यांना सेवक रामचंद्र देशमुखांनी फुलबाग येथील बाबा गंगादास यांच्या मठात आणले. परंतु त्यांची उपचार करण्याची इच्छा नव्हती. आपला देह क्रूर इंग्रजांच्या हाती लागू नये अशी त्यांची इच्छा होती. ग्वाल्हेरमध्ये झाशीची राणी लक्ष्मीबाई यांना वयाच्या 23 व्या वर्षी 18 जून 1858 रोजी रणांगणात वीरमरण आले.
1928 : दारा सिंह यांचा जन्मदिवस (Dara Singh birth Anniversary)
मुष्टीयोद्धा आणि अभिनेता दारा सिंह यांचा आज जन्मदिवस. त्यांचे बालपण पंजाबातील अमृतसरजवळील धर्मू चाक नावाच्या खेड्यात गेले. वयाच्या एकोणिसाव्या वर्षी दारा कुस्तीच्या आखाड्यात उतरले. त्यांनी किंगकॉंगला देखील कुस्तीत हरवलं होतं. दारासिंग युरोपात गेले भरपूर कुस्त्या खेळले आणि तिथेही त्यांनी कुस्तीत एकदाही न हरण्याचा विक्रम केला. यानंतर त्यांनी बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी विविधांगी भूमिका साकारल्या. 12 जुलै 2012 रोजी त्यांचा मृत्यू झाला.
1917 : इंदिरा गांधींचा जन्मदिन (Indira Gandhi Birth Annivarsary)
देशातील सर्वात शक्तिशाली आणि दृढ निश्चय असलेली व्यक्ती अशी ओळख असलेल्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची आज जयंती. इंदिरा गांधी हे भारताच्या राजकारणातील एक असे नाव ज्यांचे व्यक्तिमत्व आणि कार्य नेहमीच चर्चेत राहिले. देशाच्या पहिल्या आणि एकमेव महिला पंतप्रधान या नात्याने त्यांनी असे अनेक निर्णय घेतले, ज्यामुळे मोरारजी देसाई ज्या इंदिराजींना ‘गुंगी गुडिया’ असं म्हटलेल्या इंदिरा गांधी ‘आयर्न लेडी’ म्हणून उदयास आल्या. त्या भारताच्या चार वेळा पंतप्रधान झाल्या.
इंदिरा गांधींचे काही निर्णय वादग्रस्त राहिले. पंतप्रधान म्हणून त्यांच्या शिफारशीवरून देशात लागू करण्यात आलेली आणीबाणी ही त्या निर्णयांमध्ये गणली जाते. ज्यामुळे त्यांना आपली सत्ता गमवावी लागली. त्यांच्याच पंतप्रधानपदाच्या कार्यकालात 1971 साली पाकिस्तानचे दोन तुकडे झाले आणि बांग्लादेशची निर्मिती झाली होती. आणखी एक वादग्रस्त निर्णय त्यांच्या मृत्यूचे कारण बनला. जून 1984 मध्ये अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात केलेल्या लष्करी कारवाईची किंमत त्यांना जीव गमावून चुकवावी लागली. त्यांच्याच शीख अंगरक्षकांनी त्यांची हत्या केली. 2013 सालापासून इंदिरा गांधी यांच्या जयंतीदिनी राष्ट्रीय एकात्मता दिन म्हणून साजरा केला जातो.
1951 : झीनत अमान यांचा जन्म (Zeenat Aman birth day)
ज्येष्ठ अभिनेत्री झीनत अमान या त्यांच्या काळातील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक. 70 आणि 80 च्या दशकात त्यांनी जोरदार काम केलं. त्या काळात झीनत यांनी महिलांसाठी असलेल्या सर्व स्टिरियोटाइप्स मोडून काढल्या आणि स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. झीनत यांनी फेमिना मिस इंडिया आणि मिस एशिया पॅसिफिक इंटरनॅशनल या किताब जिंकले. झीनत अमान यांनी ‘यादों की बारात’, ‘रोटी कपडा और मकान’, ‘वॉरंट’, ‘धरम वीर’, ‘छैला बाबू’, ‘सत्यम शिवम सुंदरम’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये जबरदस्त काम केलं आहे.
1960 : महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाची स्थापना
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृतिक मंडळाचि स्थापना 19 नोव्हेंबर 1960 ला झाली. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृतिक मंडळाची स्थापना 19 नोव्हेंबर 1960 ला झाली. 'मराठी भाषा, साहित्य, संस्कृती व कला या क्षेत्रांमध्ये महाराष्ट्रास लाभलेला थोर वारसा जतन आणि संवर्धन करण्यासाठी, मराठी भाषेत विविध विषयांवरील मूलभूत संशोधन व प्रकाशन यांना उत्तेजन देण्याच्या हेतूने महाराष्ट्र शासनाने ही संस्था उभारली. मंडळाचे पहिले अध्यक्ष तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी होते.
1975 : सुश्मिता सेनचा जन्मदिवस ( Sushmita Sen birthday)
बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनचा आज वाढदिवस. 1994 मध्ये सुष्मिता सेनने वयाच्या अवघ्या 18 व्या वर्षी फेमिना मिस इंडियाचा किताब जिंकला होता. त्याच वर्षी सुष्मिता मिस युनिव्हर्स देखील झाली. अनेक हिंदी सिनेमांमध्ये सुश्मितानं भूमिका निभावल्या आहेत.
1982 : आजच्याच दिवशी नवव्या आशियाई खेळांची भारतात दिल्ली येथे सुरुवात झाली होती.
1986 : पर्यावरण संबधी सुरक्षा कायदा आजच्याच दिवशी लागू करण्यात आला होता.
1994 : अभिनेत्री ऐश्वर्या राय मिस वर्ल्ड झाली (Aishwarya Rai)
अभिनेत्री ऐश्वर्या रायला 19 नोव्हेंबर 1994 रोजी वयाच्या 21 वर्षी मिस वर्ल्डचा ताज आपल्या नावे केला. ती त्यावेळी आर्किटेक्चरचे शिक्षण घेत होती. दक्षिण आफ्रिकेतील सन सिटी एन्टरटेन्मेंट सेंटरमध्ये 87 देशांच्या मॉडेल्सना पछाडत ऐश्वर्याने मिस वर्ल्ड होण्याचा मान पटकावला होता.
1995 : कर्णम मल्लेश्वरीनं भारोत्तोलन विश्वविक्रम केला
कर्णम मल्लेश्वरीनं 1995 च्या चीनमध्ये आयोजित विश्वचषक स्पर्धेत आजच्याच वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. 2000 मध्ये ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला आहे. 1994 मध्ये त्यांना अर्जुन पुरस्कार आणि 1999 मध्ये राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार हा भारताचा सर्वोच्च क्रीडा सन्मान मिळाला. त्यांना पद्मश्री पुरस्कारही मिळाला आहे.
1997 : कल्पना चावला अंतराळात जाणाऱ्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या (Kalpana Chawla)
आजच्या तारखेला ही ऐतिहासिक घटना घडलेली. 17 मार्च 1962 रोजी जन्मलेली कल्पना चावला यांचं बालपण हरियाणाच्या कर्नालमध्ये गेलं. त्या अंतराळात भरारी घेणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या. 1976 साली कर्नाल टागोर स्कूलमधून त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केलं. तर 1982साली पंजाब इंजिनीअरिंग कॉलेजमधून वैमानिक इंजिनिअरिंग (Aeronautical Engineering) मध्ये पदवी घेतली. 19 नोव्हेंबर 1997 रोजी त्यादिवशी हरियाणाच्या मुलीनं अंतराळात झेप घेतली. त्यानंतर जानेवारी 2003च्या 16 दिवसांच्या मिशनमध्ये त्यांची त्यांची विशेष तज्ज्ञ म्हणून नेमणूक केली. मात्र 1 फेब्रुवारी 2003ला यानाचा आणि नियंत्रण कक्षाचा संपर्क तुटला. कोलंबिया स्पेस शटलचा अपघात झाला आणि त्यातच इतर अंतराळवीरांसह कल्पना चावला यांचही निधन झालं.