On This Day In History: आज जरी विविध देशांकडे मोठमोठ्या विमानवाहू युद्धनौका आहेत. पण जहाजाच्या छोट्या पट्टीवर पहिल्यांदा विमान उतरवण्याचे श्रेय अमेरिकन पायलट यूजीन बर्टन एली यांना जाते. 18 जानेवारी 1911 रोजी सॅन फ्रान्सिस्को खाडीत पहिल्यांदा पेनसिल्व्हेनिया या युद्धनौकेच्या हवाई पट्टीवर विमान उतरवण्याचे धोकादायक कार्य हाती घेऊन त्यांनी अमेरिकन नेव्हीच्या इतिहासात नाव नोंदवलं.
1842: समाजसुधारक महादेव गोविंद रानडे यांची जयंती (Mahadev Govind Ranade)
महादेव गोविंद रानडे हे महाराष्ट्रातील समाजसुधारक होते, तसेच ते अर्थशास्त्रज्ञ व मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते. 1878 साली पुणे येथे झालेल्या पहिल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचे ते अध्यक्षही होते. 1885 मध्ये ते मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती झाले. रानडे यांना आधुनिक भारताच्या इतिहासात महाराष्ट्रातील समाजसुधारणा चळवळीत महत्त्वाचे स्थान आहे. शिक्षणाचा प्रसार व्हावा, स्त्रियांनाही शिक्षण घेता यावे यासाठी त्यांनी मुलींच्या शाळा सुरू केल्या. त्यांनी शिक्षण, समाजसेवा, राजकारण तसेच आर्थिक बाबतीत अमूल्य कार्य केले.
1896: 'एक्स-रे मशीन' प्रदर्शित करण्यात आली (X ray machine)
एक्स-रे मशीनचा शोध ब्रिटिश शास्त्रज्ञ विल्हेल्म रोएंटजेन यांनी लावला. रोंटगेन यांनी 1895 साली क्ष-किरणांचा शोध लावला. पण, एक्स-रे मशीनची औपचारिक ओळख 18 जानेवारी 1896 रोजी झाली. एच.एल.स्मिथ यांनी एक्स-रे मशीन मशीन सादर केली. एक्स-रे आरोग्य विश्वातील सर्वात मोठी क्रांती होती. यामुळे हाडांच्या संबंधित रोग ओळखणे सोपे झाले. विल्हेल्म रोंटगेनमुळेच आज आपण आपल्या शरीरातील अंतर्गत अवयव स्पष्टपणे पाहू शकतो.
1972: विनोद कांबळी जन्मदिन (Vinod Kambli)
भारताचा माजी खेळाडू विनोद कांबळी आज 51 वर्षांचा झाला आहे. विनोद कांबळीने 1991 मध्ये भारताकडून वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले, तर 1993 मध्ये त्याने इंग्लंडविरुद्ध कसोटी पदार्पण केले. विनोद कांबळी आपल्या कारकिर्दीत केवळ 17 कसोटी, 104 एकदिवसीय सामने खेळू शकला. त्याच्या नावावर 6 शतके, 17 अर्धशतके आहेत.
1997: 'नफिसा जोसेफ' 'मिस इंडिया' बनली
नफिसा जोसेफ एक भारतीय मॉडेल आणि MTV व्हिडीओ जॉकी होती. ती मिस इंडियाची 1997 ची विजेती होती आणि मिस युनिव्हर्स सौंदर्य स्पर्धेत उपांत्य फेरी गाठली होती.
2003 : प्रसिद्ध कवी आणि लेखक हरिवंशराय बच्चन यांची पुण्यतिथी (Harivansh rai bachchan)
प्रसिद्ध कवी आणि लेखक हरिवंशराय बच्चन यांची आज पुण्यतिथी आहे. त्यांचा जन्म 27 नोव्हेंबर 1907 रोजी झाला. आजची पिढी त्यांना अमिताभ बच्चन यांचे वडील म्हणून ओळखत असेल, पण हिंदी साहित्यातील त्यांचे योगदान नेहमीच कौतुकास्पद राहील. हरिवंश राय यांनी 1938 मध्ये अलाहाबाद विद्यापीठातून इंग्रजी साहित्यात एमए केले आणि 1952 पर्यंत अलाहाबाद विद्यापीठात लेक्चरर म्हणून काम केले. 1952 मध्ये पुढील शिक्षणासाठी ते इंग्लंडला गेले, तेथे त्यांनी केंब्रिज विद्यापीठात इंग्रजी साहित्य/कवितेवर संशोधन केले. 1955 मध्ये केंब्रिजहून परत आल्यानंतर त्यांची भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयात हिंदी तज्ञ म्हणून नियुक्ती झाली. ते राज्यसभेचे नामनिर्देशित सदस्य देखील होते. 1976 मध्ये त्यांना पद्मभूषण हा पूरस्कार मिळाला. त्याआधी त्यांना 1968 मध्ये 'दो चटणें' (कविता संग्रह) साठी साहित्य अकादमी पुरस्कारही मिळाला होता. हरिवंशराय बच्चन यांचे 18 जानेवारी 2003 रोजी मुंबईत निधन झाले.
आज त्र्यंबकेश्वरमध्ये संत निवृत्तीनाथ महाराज यात्रा सोहळा
संतश्रेष्ठ निर्वृत्तीनाथ महाराजांच्या यात्रेला त्र्यंबकेश्वरमध्ये आजपासून सुरुवात होणार असून यंदा कोरोना निर्बंधमुक्तीमुळे मोठा उत्साह वारकऱ्यांमध्ये बघायला मिळतोय. महाराष्ट्रभरातून चारशे दिंड्या आणि जवळपास तिन लाखांहुन अधिक वारकरी आज रात्रीपर्यंत त्र्यंबकेश्वरला मुक्कामी पोहोचणार आहेत. जिल्हा प्रशासन आणि मंदिर संस्थानकडूनही जय्यत तयारी करण्यात आली आहे. त्र्यंबकेश्वरकडे जाणाऱ्या रस्त्यांवर आज ठिकठिकाणी विविध जिल्ह्यातील दिंड्या नजरेस पडत असून हरिनामाच्या जयघोषाने वातावरण भक्तिमय आणि भगवेमय झालय. वारकऱ्यांसाठी ठिकठिकाणी नाश्ता, चहा आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आली असून आज दुपारी अंजनेरी जवळील ब्रम्हा व्हॅली महाविद्यालयात श्री क्षेत्र जायखेड्याच्या जवळपास बाराशे वारकऱ्यांचा शिस्तबद्ध आणि नयनरम्य असा रिंगण सोहळा पार पडला आहे. सर्व वारकरी, झेंडेकरी, टाळकरी, विणेकरी, मृदुगवादक गोलाकार उभे राहतात. माऊली माऊली म्हणत हरिनामाचा गजर सुरू होतो. टाळ मृदुगाच्या एकाच तालात आणि एकाच लयित वारकरी नाचू लागतात. यानंतर दिंडीतील अश्व गोलाकार फिरत पालखीला प्रदक्षिणा मारतात. अशा पद्धतीने हा रिंगण सोहळा पार पडतो. रिंगण होताच आट्यापिट्या, एकीबेकी यासोबतच महिलांच्या फुगड्या खेळल्या जातात.
आजच्या दिवशी घडलेल्या महत्वाच्या घटना -
1930: रवींद्रनाथ टागोर यांनी महात्मा गांधींच्या साबरमती आश्रमाला भेट दिली.
1938: राजकीय कैद्यांची शेवटची तुकडी अंदमान आणि निकोबारमधील पोर्ट ब्लेअर येथून मुख्य भूभागाकडे रवाना झाली.
1947: प्रसिद्ध अभिनेते आणि गायक कुंदन लाल सहगल यांची पुण्यतिथी
1952: चंदन तस्कर वीरप्पन याचा गोपीनाथम, म्हैसूर येथे जन्म. वीरप्पन हा कुख्यात शिकारी आणि तस्कर म्हणून ओळखला जातो, जो जवळपास दोन दशकांपासून अनेक राज्यांच्या पोलिसांसाठी डोकेदुखी ठरला होता.
1968: अमेरिका आणि सोव्हिएत युनियनने अण्वस्त्रांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कराराच्या मसुद्यावर सहमती दर्शवली.
1976: फ्रान्सने हेरगिरीच्या आरोपाखाली 40 सोव्हिएत अधिकाऱ्यांची देशातून हकालपट्टी केली.
1996: आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एनटी रामाराव यांची पुण्यतिथी.