Corona Vaccines Side Effect : कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर त्याचे साईड इफेक्ट होत असल्याची चर्चा होत आहे. परंतु, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने हा दावा खोटा ठरवलाय. पीटीआय वृत्तसंस्थेच्या  वृत्तानुसार,  इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) आणि सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (CDSCO) च्या अधिकाऱ्यांनी दावा केलाय की, कोरोनाचे 'मल्टिपल साइड इफेक्ट्स' असल्याचा माध्यमांचा अहवाल चुकीचा आहे, असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.  


एका आरटीआयच्या हवाल्यानुसार, अलीकडील मीडिया रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की ICMR आणि CDSCO अधिकाऱ्यांनी कोविड-19 लसींचे दुष्परिणाम मान्य केले आहेत आणि म्हटले आहे की कोरोना लसीचे एक नाही तर अनेक दुष्परिणाम आहेत. परंतु, माध्यमांचा हा रिपोर्ट चुकीची माहिती देणारा असल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे.   


 केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सार्वजनिक डोमेनमधील जागतिक वैज्ञानिक पुराव्यासह सक्रिय प्रकटीकरणाच्या धोरणानुसार, ICMR COVID-19 लसींचे फायदे आणि तोटे संबंधित RTI कायद्यांतर्गत प्रश्नांची उत्तरे देते. प्रत्युत्तरादाखल  मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, ICMR ने जागतिक आरोग्य संघटना (WHO), सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल (CDC) आणि आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाइटवर लिंक जाहीर केल्या आहेत. या लिंकवर विविध कोविड-19 लसींबाबत जागतिक पुरावे संकलित केले असून तेथे ते उपलब्ध आहेत. 


मंत्रालयाने म्हटले आहे की, इतर सर्व लसींप्रमाणेच कोविड-19 लसींच्या बाबतीतही आहे. ही लस दिल्यानंतर व्यक्तीला वेदना, डोकेदुखी, थकवा, स्नायू दुखणे, पायरेक्सिया, थंडी वाजून येणे, सांधेदुखी इत्यादीसारखी सौम्य लक्षणे जाणवू शकतात. इतर लस दिल्यानंतर देखील अशी सोम्य लक्षणे जाणवतात. परंतु, कोरोनाच्या लसीमुळे गंभीर स्थितीचा सामना करणाऱ्या लोकांची संख्या खूपच कमी आहे.    


Corona Vaccines  :  कोरोना प्रतिबंधक लस प्रभावी आहे


जागतिक संशोधन अभ्यासातून असे दिसून आले आहे की, कोरोनाच्या लसीकरणामुळे  हॉस्पिटलायझेशन आणि मृत्यू टाळून कोरोनाची तीव्रता कमी करण्यात मदत झाली आहे. भारतात NTAGI (नॅशनल टेक्निकल अॅडव्हायझरी ग्रुप ऑन इम्युनायझेशन) ने वेळोवेळी देशात वापरल्या जाणार्‍या कोविड लसींचे फायदे आणि दुष्परिणाम यांचा आढावा घेतला आहे.  


दरम्यान, नॅशनल ड्रग कंट्रोलर जनरलने मंजूर केलेल्या कोविड-19 लसींची यादी cdsco.gov.in या वेबसाइटवर उपलब्ध आहे, अशी माहिती सीडीएससीओने दिली आहे.