नवी दिल्ली: भारतात वायू प्रदूषणासाठी चार चाकी वाहनांना सर्वाधिक जबाबादार धरलं जातं. जुनी चारचाकी वाहनं तर या यादीत वरच्या स्थानी आहेत. हेच लक्षात घेऊन, ‘सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चर्स’ने सरकारकडे 15 वर्ष जुन्या वाहनांवर बंदी घालण्याची मागणी केली आहे.
जुन्या वाहनांवर बंदी घातली तर प्रदूषणाची समस्या कमी होईल, अशी आशा आहे. ‘सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चर्स’च्या 57 व्या वार्षिक संमेलनात, अध्यक्ष विनोद दसरा यांनी, प्रदूषण आणि वाहनांबद्दल आपलं मत व्यक्त केलं. वायू प्रदूषण कमी करण्यासाठी ऑटो इंडस्ट्री सातत्याने प्रयत्न करत असल्याचं विनोद दसरा म्हणाले.
काळानुसार आम्ही बीएस-6 इंजिनाकडे वाटचाल करत आहोत. मात्र त्याचवेळी सरकारने 15 वर्ष जुन्या वाहनांवर बंदी घालणं हे प्रदूषणाच्या दृष्टीने गरजेचं आहे, असं दसरा यांनी नमूद केलं. याशिवाय त्यांनी सरकारकडे ‘नॅशनल ऑटोमोटिव्ह बोर्ड’ची स्थापना करण्याची मागणी केली आहे. यामार्फत प्रदूषणाला आळा बसवण्यासाठी धोरण निश्चित करता येईल.