मुंबई : शहीद कर्नल संतोष महाडिक यांच्या पत्नी स्वाती महाडिक या लेफ्टनंटपदी रुजू झाल्या आणि साताऱ्यासह राज्याची मान उंचावली. देशवासियांचा ऊर भरुन आला आणि याच स्वाती महाडिक यांना मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने ट्वीट करुन शुभेच्छा दिल्या आहेत.

लेफ्टनंट स्वाती संतोष महाडिक
महाराष्ट्राची वीरकन्या, वीरपत्नी स्वाती महाडिक आता लेफ्टनंट स्वाती महाडिक झाल्या आहेत. आयुष्याचा जोडीदार देशाचं रक्षण करताना अर्ध्या वाटेत सोडून गेला, मात्र आपल्या जोडीदाराचं अधुरं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनीही तीच वाट निवडली. आता एक वर्षाच्या खडतर ट्रेनिगनंतर या वीरपत्नीला नवी ओळख मिळाली आहे आणि ती म्हणजे लेफ्टनंट स्वाती महाडिक.

महाराष्ट्रासह संपूर्ण देश स्वाती महाडिक यांच्या जिद्दीला सलाम करत असताना, क्रिकेटचा देवही त्यांना शुभेच्छा द्यायला विसरला नाही. सचिन तेंडुलकरने ट्विटरवर आपल्या भावना व्यक्त केल्या.

"दोन महिलांनी त्यांचे शूर पती गमावले आणि त्यानंतर त्यांनी देशसेवेचा निर्धार केलं. स्वाती महाडिक आणि निधी मिश्रा यांच्याबद्दल अतीव आदर आहे. जय हिंद," असं ट्वीट सचिन तेंडुलकरने केलं आहे. या ट्वीटसोबत त्याने स्वाती आणि निधी यांच्या बातम्यांचे काही फोटोही पोस्ट केले आहेत.

https://twitter.com/sachin_rt/status/906808151118188544

पतीच्या पार्थिवावर देशसेवेचा निर्धार
जम्मू-काश्मीरमधील कुपवाडाच्या जंगलात देशाच्या सीमेचं रक्षण करत असताना, सह्याद्रीचा वीरपुत्र संतोष महाडिक यांना वीरमरण आलं. अतिरेक्यांना टिपून मारणाऱ्या संतोष महाडिक हे अतिरेक्यांच्या भ्याड हल्ल्यात धारातीर्थी पडले. 17 नोव्हेंबर 2015 रोजी साताऱ्याचा हा जवान शहीद झाला. या शौर्याबद्दल त्यांना मरणोत्तर ‘शौर्यचक्र’ पुरस्कारही देण्यात आला होता.
त्यांच्या पार्थिवावर पत्नी स्वाती यांनी आपण स्वत: आणि मुलं आर्मीतच जातील, असा निर्धार केला होता.

पतीच्या निधनानंतर निधी मिश्रा सैन्यात सामील
निधी मिश्रा दुबे प्रेग्नंट असताना त्यांचे पती मुकेश दुबे यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. मुकेश दुबे हे महर रेजिमेंटमध्ये नाईकपदावर कार्यरत होते. सैन्यात असणं म्हणजे काय असतं हे मुलगा सुयशला दाखवण्यासाठी निधी यांनी देशसेवेचा निर्धार केला. पण हे सोपं नव्हतं. पहिल्या पाच प्रयत्नांमध्ये त्यांना अपयश आल. "पण आता तो भूतकाळ आहे. आता मी देशसेवेसाठी तयार आहे," असं निधी मिश्रा म्हणतात.

संबंधित बातम्या

अभिमानाचे दोन स्टार खांद्यावर, वीरपत्नी स्वाती महाडिक 'इंडियन आर्मी'त रुजू

सातारा सैनिक स्कूलच्या स्टेडियमला शहीद महाडिकांचं नाव

देखना है जोर कितना…शहीद महाडिकांची पत्नी ‘इंडियन आर्मी’त!

शहीद संतोष महाडिक यांचं शेवटचं व्हॉट्सअॅप स्टेटस

शहीद संतोष महाडिक यांना मरणोत्तर शौर्य चक्र

‘माझी मुलगी आणि मुलगा लष्करातच जातील’ वीरपत्नीचा निर्धार

शहीद संतोष महाडिक अनंतात विलीन

शहिदांच्या कुटुंबियांबाबत उदयनराजे म्हणतात…

स्वाती महाडिक यांच्याशी खास बातचीत