नवी दिल्ली : बलात्कारी बाबा राम रहीम तुरुंगात गेल्यानंतर त्याची दत्तक मुलगी हनीप्रीत उर्फ प्रियंका तनेजा फरार आहे. सध्या हरियाणा पोलीस हनीप्रीतचा कसून शोध घेत आहेत.


हरियाणाच्या फतेहाबादमधील जगजीवनपुरामध्ये हनीप्रीतचा जन्म 21 जुलै 1980 रोजी झाला. तिचे वडील रामानंद तनेजा हे एक व्यावसायिक होते. त्यांच्या कुटुंबात 5 लोक आहेत. हनीप्रीतचे वडील रामानंद तनेजा, तिची आई, बहिण निशा आणि भाऊ साहिल.

हनीप्रीतनं आठवीपर्यंतचं शिक्षण एका खासगी शाळेत घेतलं. तर 9 आणि 10वी पर्यंतचं शिक्षण तिने फतेहाबादमधील डीएव्ही स्कूलमधून पूर्ण केलं. हनीप्रीतच्या कुटुंबीयांना जवळून ओळखणाऱ्यांच्या मते, तनेजा कुटुंबाला फतेहाबादमध्ये बराच मान होता.

रामानंद तनेजा यांच्या शेजाऱ्यांच्या मते, हनीप्रीत 17 वर्षापूर्वी घर सोडून गेली होती आणि तिचं संपूर्ण कुटुंब हे सिरसामधील डेऱ्यात वास्तव्यास होतं. पण तिचे कुटुंबीय सध्या कुठे आहेत हे अद्याप समजू शकलेलं नाही.

हनीप्रीतचा साखरपुडा झाल्यानंतर अचानक ऐके दिवशी तिचे कुटुंबीय सारं काही विकून डेऱ्यात निघून घेले. त्यानंतर ते पुन्हा कधीही फतेहाबादला परत आले नाही. हनीप्रीतच्या साखरपुड्याला राम रहीम स्वत: आला होता असंही सांगितलं जातं.

सध्या पोलीस हनीप्रीतसोबतच तिच्या कुटुंबीयांचा देखील शोध घेत आहेत.