मुंबई : रोज सकाळी उठल्यावर आपण जे दूध पितो ते शुद्ध आहे की भेसळयुक्त? याची खातरजमा खरं तर कुणीच करत नाही. मात्र या दुधात भेसळ असण्याची शक्यताच जास्त आहे. कारण देशात उत्पादित होणाऱ्या दुधाच्या चौपट प्रमाणात विक्री केली जाते.


आपल्या देशात दररोज 15 कोटी लिटर दुधाचं उत्पादन होतं. मात्र देशात 64 लिटर दूध रोज विकलं जात असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

देशात रोज अंदाजे 50 कोटी भेसळयुक्त दूध विकलं जातं, असा दावा अॅनिमल वेल्फेअर बोर्ड ऑफ इंडियाचे सदस्य मोहनसिंग अहलुवालिया यांनी केला आहे. देशातील 68.7 टक्के दूध हे अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाच्या निकषांवर नापास झालं आहे.

डिसेंबर 2016 मध्ये सुप्रीम कोर्टाने केंद्राला दूध भेसळीची तातडीने चौकशी करण्याचे आदेश दिला होता. त्यावर सरकारने अर्थमंत्री अरुण जेटलींच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली. मात्र गेल्या पावणेदोन वर्षात या समितीची एकही बैठक झाली नाही, असा दावा अहलुवालियांनी केला.