सांबामधील रामगड सेक्टरध्ये परीच्या घरी भाऊबीजेला पाकिस्तानी जवानांनी फेकलेला मोर्टार फुटला. यामध्ये तिचे आजोबा, आत्या आणि दोन्ही भावांच्या मृत्यू झाला. तर परी रुग्णालयात असून तिची प्रकृती नाजूक आहे.
या चिमुकलीच्या शरीरात बॉम्बचे छर्रे घुसले आहेत. कण्यापासून शरीरातील अनेक भागांना दुखापत झाली आहे. नस फाटल्याने तिला श्वास घेण्यास अडचणी येत आहेत. तिचे प्राण वाचवण्यासाठी डॉक्टरांना ऑपरेशन करावं लागलं. सुमारे दोन तास तिच्यावर शस्त्रक्रिया सुरु होती. डॉक्टरांच्या माहितीनुसार, पुढील काही तास तिच्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. तिच्यावर देखरेख असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.
भाऊबीजेच्या दिवशी चिमुकली परी तिच्या दोन भावांसह अंगणात खेळत होती. मात्र त्यावेळी पाकिस्तानकडून गोळीबार सुरु झाला. पाकिस्तानी रेंजर्सनी फेकलेला मोर्टार अंगणात पडला. या घटनेत परीच्या दोन्ही भावांसह चार जणांचा मृत्यू झाला. यात भावांसह आजोबा आणि आत्याचाही समावेश आहे.
परीचे वडील राकेश कुमार हॉस्पिटलमध्ये आहेत. ते स्वत: एक सैनिक आहेत. दिवाळीनिमित्त ते घरी आले होते. तर आईलाही दुखापत झाली आहे. पण यावेळी कुटुंबासह संपूर्ण देश परीच्या आयुष्यासाठी प्रार्थना करत आहे.
पाकिस्तानने सीमेजवळील गावांवर केलेल्या हल्ल्यात 8 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यात दोन मुलं, चार महिलांसह आठ जणांनी प्राण गमावले आहेत.
संबंधित बातम्या