नवी दिल्ली: माजी सैनिक रामकिशन ग्रेवाल यांच्या आत्महत्येनंतर दिल्ली मध्ये सकाळपासून सुरू झालेलं राजकीय महाभारत अजुनही सुरूच आहेत. माजी सैनिकांना मिळणाऱ्या अपुऱ्या पेन्शनमुळं रामकिशन ग्रेवाल यांनी आत्महत्या केल्याचा आरोप होतो आहे.

या मुद्द्यावरून काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी कार्यकर्त्यांसह रस्त्यावर उतरले आहेत तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी देखील मोदी सरकारवर जोरदार हल्ला बोल केला आहे. दिवसभरात दिल्ली पोलिसांनी राहुल गांधींना दोनदा ताब्यात घेतलं होतं. मात्र, नंतर त्यांची सुटका करण्यात आली. तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही लेडी हार्डिंग रुग्णालयाबाहेरून ताब्यात घेण्यात आलं आहे.

त्यापूर्वी सकाळी आपचे नेते मनिष सिसोदीयांना देखील पोलिसांनी ताब्यात घेऊन सोडलं. दरम्यान, आत्महत्या केलेल्या ग्रेवाल यांच्या नातेवाईकांना अटक केल्यानंतर राहुल गांधी आणि अरविंद केजरीवालांनी सरकारवर जोरदार टीका केली.